अजोय मेहता यांची सदनिका वादात

मेहता हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार होते.

विकत घेताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्याचे मेहतांचे स्पष्टीकरण
मुंबई : महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण म्हणजे महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता यांचे मुंबईतील अपार्टमेंट प्राप्तिकर खात्याच्या रडारवर आले असून सदर अपार्टमेंटच्या आधीच्या मालमकाने बनावट कंपन्यांतून मिळालेली संपत्ती दडवण्यासाठी बेनामी मालमत्तेपोटी हे अपार्टमेंट खरेदी केले होते. मेहता हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार होते.

नंतर त्यांची नेमणूक यावर्षी फेब्रुवारीत महारेरामध्ये झाली होती. ते मुंबई महापालिकेचे आयुक्तही होते. ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांनी सांता कोऑपरेटिव्ह गृहनिर्माण संस्थेत मुंबईतील नरीमन पॉइंट येथे पुणे येथील अनामित्र प्रॉपर्टीज प्रा. लि यांच्याकडून ५.३३ कोटी रु पयांना अपार्टमेंट विकत घेतले होते. ७ जुलै रोजी प्राप्तिकर विभागाने अनामित्र प्रॉपर्टीजला कारणे दाखवा नोटीस पाठवली असून मे २००९ मध्ये ४ कोटी रुपयांचा झालेला हा व्यवहार बेनामी आहे. कारण या कंपनीचे दोन नोंदणीकृत शेअरधारक हे कमी साधन संपत्ती असलेले आहेत. त्यांना या अपार्टमेंटच्या मालकीची माहिती नाही. ते अशी वास्तू घेऊच शकत नाहीत.

१९८४ च्या आयएएस तुकडीतील अधिकारी असलेले मेहता यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, ही वास्तू खरेदी कायदेशीर असून सर्व सोपस्कार पार पाडले आहेत. बाजारदराने पैसे दिले आहेत. मी करदाता आहे त्यामुळे यात आपला काही दोष नाही. प्राप्तिकर खात्याने अनामित्र प्रॉपर्टीजचे शेअरधारक कामेश नाथुनी सिंह हे मुंबईच्या पश्चिाम उपनगरातील चाळीत राहतात असे प्राप्तिकर खात्याच्या नोटिशीत म्हटले आहे. दुसरे शेअरधारक रवींद्र सिंह यांनी १.७१ लाख रुपये उत्पन्न दाखवले असून त्यांनी केवळ २०२०-२१ चे विवरण पत्र भरलेले आहे. कामेश नाथुनी सिंह व दिपेशी रवींद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना अनामित्र प्रॉपर्टीजच्या शेअर्सच्या खरेदीची माहिती नाही. बेनामी मालमत्ता व्यवहार विरोधी कायद्यानुसार प्राप्तिकर  खात्याने म्हटले आहे की, या दोघाही शेअरधारकांना सदर व्यवहाराची माहिती नाही. त्यामुळे अनामित्रची मालमत्ता बेनामी का जाहीर करू नये. कंपनी अधिकृत असून त्यांचे भांडवल हे प्रत्येकी  १ लाख रुपये आहे. कंपनीची आर्थिक माहिती पाहिली असता त्यातून असे दिसून आले की, त्यांचा कुठलाही उद्योग नसून केवळ बनावट कंपनीच्या माध्यमातून ही बेनामी मालमत्ता त्यांनी खरेदी केली होती. त्यामुळे अनामित्र प्रॉपर्टीज प्रा.लि यांना आम्ही बेनामीदार संबोधत  आहोत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ajoy mehta flat in dispute maharashtra real estate regulatory authority akp

ताज्या बातम्या