मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त, राज्याचे सेवानिवृत्त मुख्य सचिव आणि सध्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार असलेल्या अजोय मेहता यांचा नरिमन पॉईंट येथील फ्लॅट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मेहता यांनी मंत्रालयाजवळच्या जग्गनाथ भोसले मार्गावरील समता को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरचा फ्लॅट विकत घेतलेला आहे. नरिमन पॉईंट भागात असलेला हा फ्लॅट मेहता यांनी तब्बल ५.३ कोटी रुपयांना विकत घेतला होता. बेनामी देवाणघेवाण झाल्याच्या मुद्दा या व्यवहारात समोर आला असून, हा फ्लॅट इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आला आहे. अजोय मेहता यांची फेब्रवारीमध्ये महारेराच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

‘इंडिया टुडे’नं सुत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. दक्षिण मुंबईत एका संपत्ती व्यवहारात बोगस कंपनीची स्थापन करून बेनामी व्यवहार करण्यात आल्याचं इन्कम टॅक्स विभागाच्या बेनामी संपत्ती शाखेला आढळून आलं. दक्षिण मुंबईतील फ्लॅट खरेदी व्यवहार एक शेल कंपनी (बोगस कंपनी) आणि सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यामध्ये झाला असल्याचं समोर आलं. मेहता यांनी मंत्रालयाजवळच्या समता को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरचा फ्लॅट विकत घेतलेला आहे. १,०७६ चौरस मीटर या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे.

ज्या कंपनीकडून फ्लॅट खरेदी करण्यात आला, त्या कंपनीचे दोन भागधारक असून, दोघेही मुंबईतील चाळीत राहतात अशी माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ही कंपनी फ्लॅट खरेदी व्यवहारासाठीच निर्माण करण्यात आलेली होती. अनामित्रा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. बेनामी व्यवहार विभागाला कंपनीच्या बॅलन्सशीटमध्ये अनेक विसंगती दिसून आले आहे. कंपनीच्या भागधारकांनी कर भरणाच केला नसल्याचं दिसून आलं आहे.

संबंधित वृत्त- मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजोय मेहतांनी नरिमन पॉईंटला घेतला ५.३ कोटींचा फ्लॅट

अनामित्रा प्रॉपर्टीज प्राइव्हेट लिमिटेडने २००९मध्ये ४ कोटी रुपयांना हा फ्लॅट खरेदी केला होता. त्यानंतर नरिमन पॉईंट भागात असलेला हा फ्लॅट मेहता यांनी तब्बल ५.३ कोटी रुपयांना विकत घेतला होता. कामेश नथुनी सिंह आणि दीपेश रवींद्र सिंह अशी कंपनीच्या भागधारकांची नावं आहेत. यातील कामेश सिंह यांच्या नावे कंपनीचे ९९ टक्के भाग आहेत. कामेश सिंह प्राप्तीकरच भरत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा पत्ता वेस्टर्न एक्स्प्रेस वे वरील श्याम नारायण यादव चाळमध्ये दाखवण्यात आलेला आहे.

तर दुसरे भागधारक दीपेश रवींद्र सिंह यांनी केवळ २०२०-२१ या वर्षातच आयकर रिटर्न्स भरला आहे. त्यात त्यांचं उत्पन्न १,७१,००२ इतकं आहे. दोन्ही भागधारक कमी उत्पन्न गटातील असल्याचंच दिसून आलं असून, त्यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती खरेदी करण्याची क्षमता नसल्याचंही या व्यवहाराच्या तपासातून समोर आलं आहे.