मुंबई : अकासा एअर ४ सप्टेंबरपासून मुंबई – हनोई थेट विमानसेवा सुरू करणार असून, या मार्गावरील ही पहिली भारतीय विमान कंपनी ठरणार आहे. मुंबई – हनोई दरम्यान आठवड्यातून चार विमानसेवा चालविण्यात येणार आहेत. थेट विमानामुळे प्रवासाचा वेळ पाच तासांपेक्षा कमी होणार असल्याने प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.

व्हिएतनामकरिता मुंबई आणि भारतातून मोठ्या प्रमाणात प्रवासी ये – जा करतात. अकासा एअरच्या मुंबई – व्हिएतनामची राजधानी हनोईदरम्यान थेट विमानसेवेमुळे या विशिष्ट मार्गावर सेवा देणारी जागतिक स्तरावरची तिसरी विमान कंपनी बनणार आहे. आतापर्यंत, या मार्गावर फक्त व्हिएतजेट आणि व्हिएतनाम एअरलाइन्ससारख्या व्हिएतनामी विमान कंपन्याच सेवा देत होत्या. हनोई हे अकासा एअरचे सातवे आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थान असणार आहे. अकासा एअरची दोहा, कुवेत आणि जेद्दाहसारख्या प्रमुख मार्गावर विमानसेवा सुरू आहे.

मुंबई-हनोई विमानाचे वेळापत्रक

मुंबई – हनोई विमानसेवा सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी असणार आहे. विमान क्रमांक क्यूपी-०६२५ मुंबईहून पहाटे ५.३५ वाजता सुटेल आणि स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजता हनोईला पोहोचेल. त्याचप्रमाणे, परतीचे विमान क्यूपी-०६२६ स्थानिक वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५.१० वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल.

हनोईला प्रवाशांची वाढती मागणी

समृद्ध वारसा आणि खिशाला परवडणारी यामुळे कमी अंतराच्या आंतरराष्ट्रीय सहलींच्या वाढत्या मागणीमुळे, भारतीय प्रवाशांकडून हनोईला पसंती मिळत आहे.

प्रवाशांच्या वेळेत बचत

इतर विमान कंपन्या अनेकदा प्रवाशांना बँकॉक किंवा सिंगापूरसारख्या कनेक्टिंग हबमार्गे होनोईला पाठवतात. ज्यामुळे एकूण प्रवासाचा वेळ नऊ तासांपेक्षा जास्त होतो. तर अकासाच्या थेट विमानामुळे प्रवासाचा वेळ पाच तासांपेक्षा कमी होतो. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होईल. तसेच व्हिएतनामी विमान कंपन्या सोमवारी आणि शुक्रवारी या मार्गावर विमानसेवा चालवत नाहीत. त्यामुळे या दिवशी अकासा एअरच्या विमानामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल.

हनोईसाठी थेट विमानसेवा सुरू झाल्याने दक्षिण आशियामध्ये आमचे स्थान अधिक मजबूत होईल. भारतीय प्रवाशांसाठी सर्वात आकर्षक, कमी अंतराच्या पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून व्हिएतनाम उदयास आले आहे.– आनंद श्रीनिवासन, सह-संस्थापक आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी, अकासा एअर