मुंबई : अकासा एअरने अपुऱ्या पायाभूत सुविधा, थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी नसणे आणि कमी प्रवासी संख्येमुळे नोएडा (जेवर) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यानची विमानसेवा मुंबई विमानतळाकडे वळविली होती. आता टर्मिनस १ च्या पुनर्विकासाच्या कामामुळे १ ऑक्टोबरपासून ही सेवा मुंबई विमानतळाऐवजी नवी मुंबई विमानतळाकडे वळविण्यात येणार आहे.

पश्चिम उत्तर प्रदेश आणि नवी मुंबईच्या विस्तारणाऱ्या औद्योगिक पट्ट्यांदरम्यान प्रवास करणाऱ्या कॉर्पोरेट आणि प्रवासी वर्गाला आकर्षित करण्यासाठी अकासा एअरने थेट विमान सेवा सुरू केली होती. मात्र थेट मेट्रो किंवा जलद रेल्वेसेवेचा अभाव, टॅक्सीचे जास्त दर आणि प्रवासासाठी लागणारा जास्त वेळ यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. दोन्ही विमानतळांवर अत्याधुनिक टर्मिनल सुविधा असल्या तरी या दोन्ही ठिकाणांना जोडणारी रस्ते वाहतूक अद्याप चांगली नाही. त्यामुळे अकासाने काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई – नोएडादरम्यानची थेट विमानसेवा बंद करून ती मुंबई विमानतळानरून चालविण्यास सुरुवात केली होती.

१ ऑक्टोबरपासून ३० टक्के विमाने नवी मुंबईकडे

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ च्या पुनर्विकासाचे काम १५ जानेवारी २०२७ पासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या १ ऑक्टोबरपासून ३० टक्के विमाने नवी मुंबईकडे वळविली आहेत. अकासा एअरने नोएडा – मुंबईदरम्यानचे दुपारी २.०१ चे विमान ३० सप्टेंबरपासून बंद केले आहे. या विमानाचे बुकिंग देखील बंद आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रीचे ९.०५ चे विमानही बंद केले आहे. यामुळे नोएडा – मुंबईदरम्यानच्या प्रवाशांना आता केवळ इंडिगोच्या दुपारच्या ३ च्या विमानाचा आधार घ्यावा लागणार आहे. नोएडाहून सकाळी ११ वाजता उडालेले विमान नवी मुंबई विमानतळावर दुपारी १.१५ वाजता येणार आहे.