मुंबई : पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे भारत आणि आखाती प्रदेशातील अनेक प्रमुख देशांदरम्यानच्या विमान सेवा बाधित झाल्या आहेत. अकासा एअरने सुरक्षा मूल्यांकनानंतर जेद्दाह आणि रियाध ते अहमदाबाद, बंगळूर, मुंबई, कोची आणि कोझिकोड शहरांदरम्यानची विमान सेवा सुरू ठेवली आहे. दरम्यान, अबू धाबी, दोहा आणि कुवेतसाठीची विमान सेवा ३१ मार्चपर्यंत स्थगित केली आहे.
इराण-इस्त्रायल,अमेरिकादरम्यान शनिवार, २८ फेब्रुवारीपासून युद्ध सुरू आहे. युद्धामुळे आखाती देशांनी हवाई निर्बंध घातले आहेत. यामुळे जगभरातील विमान सेवा कोलमडली आहे. २६ दिवस झाले तरी युद्ध सुरुच असल्याने विमान वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. विमान कंपन्यांनी विमान सेवेत बदल केले असून आजही आखाती देशांदरम्यानची विमान वाहतूक विस्कळीतच आहे. तसेच हवाई निर्बंधामुळे युरोप, अमेरिका दरम्यानची हवाई सेवा देखील विस्कळीत झाली आहे. याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये प्रवाशांना मध्य पूर्वेतील त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यास मदत करण्यासाठी विमान कंपन्या दररोज उड्डाणांच्या वेळापत्रकाचे नियोजन करीत आहेत. नियमित उड्डाणांच्या तुलनेत केवळ २५ टक्के हवाई वाहतूक सध्या सुरू आहे. याचा विमान कंपन्यावर आर्थिक परिणाम झाला आहे. विमान कंपन्यांनी तिकिटांवर इंधन भार लावला असून तिकिट दरात वाढ झाली आहे.
