मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) काही वर्षांपूर्वी सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्ता (एससीएलआर) प्रकल्पाअंतर्गत वाकोला ते वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत हा पूल पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांमुळे या प्रकल्पास विलंब झाला. आता हा पूल सेवेत दाखल करण्याचा मुहूर्त आणखी काही दिवस पुढे गेला आहे.

मार्चअखेरपर्यंत सेवेत दाखल होणारा पूल आता एप्रिलच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत ९६ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण करून पूल एप्रिलमध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा पूल सेवेत दाखल झाल्यास बीकेसी ते पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यानचा प्रवास अतिजलद होणार आहे.

सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याच्या विस्तारीकरणाअंतर्गत एमएमआरडीएने तीन पुलांचे बांधकाम हाती घेतले आहे. त्यापैकी दोन पुलांचे काम पूर्ण झाले असून ते वाहतूक सेवेत दाखल झाले आहेत. मात्र यातील शेवटचा बीकेसी ते वाकोला (पश्चिम द्रुतगती महामार्ग) उड्डाणपूल अद्याप सेवेत दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, विद्यापीठ जंक्शन आणि बीकेसी जंक्शन येथे पोहोचणे सोपे व्हावे यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.

दोन मार्गिकांचा आणि सुमारे ६४५ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल झाल्यास बीकेसीतून पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोहोचणे वाहनचालक व प्रवाशांसाठी सोपे होणार आहे. सध्या कलानगर जंक्शनवरून वळसा घालून वाकोला येथे जावे लागते. मात्र हा पूल सुरू झाल्यानंतर बीकेसीतून थेट वाकोला येथे अवघ्या काही मिनिटांत पोहोचता येणार आहे. त्यामुळे हा पूल सेवेत केव्हा दाखल होईल, याकडे वाहनचालक व प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

एमएमआरडीएने मार्चअखेरीस हा पूल वाहतूक सेवेत दाखल केला जाईल, असे जाहीर केले होते. मात्र आता हा पूल काहीसा विलंबाने सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पूल वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाकोला ते बीकेसी उड्डाणपुलाचे ९६ टक्के काम पूर्ण झाले असून आता काही तुरळक कामे शिल्लक आहेत. ही कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल.

हा पूल सेवेत दाखल झाल्यास सिग्नलमुक्त अतिजलद प्रवास शक्य होणार असून प्रवासी आणि वाहनचालकांचा सुमारे २० ते २५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. तसेच वाकोला ते बीकेसी हे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार करता येणार आहे. परिणामी, वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, विद्यापीठ जंक्शन आणि बीकेसी जंक्शन येथे पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.