मुंबई : भूजल पातळीतील घट आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची शक्यता लक्षात घेऊन अकोला जिल्ह्यात नवीन विहिरी आणि कूपनलिका (बोअरवेल) खोदण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्यात अशा प्रकारची बंदी लागू करणारा अकोला हा पहिला जिल्हा ठरला आहे. भूजलाचे घटते साठे आणि पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता, ही बंदी केवळ अकोला जिल्ह्यापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यात लागू करावी, अशी मागणी अकोल्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केली आहे.
अकोला जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष वर्षा मीना यांनी नवीन विहिरी व कूपनलिका खोदकामावर बंदी घातली आहे. पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या निर्देशानुसार ही बंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शहरी आणि ग्रामीण भागांत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपासून ५०० मीटरच्या परिघात कोणत्याही खासगी अथवा व्यावसायिक वापरासाठी नवीन विहीर किंवा कूपनलिका खोदण्यास तात्काळ पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचा अंमल संपूर्ण अकोला जिल्ह्यात करण्यात येणार आहे. पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता असताना नव्याने कूपनलिका खोदण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. भूजलाचा उपसा वाढून परिसरातील भूजल पातळी आणखी खालावत असल्याने चिंता वाढली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होऊ नये, यासाठी भूजलसाठ्यांचे संरक्षण आणि उपलब्ध पाण्याचे नियोजन आवश्यक असल्याचे फुंडकर यांनी म्हटले आहे.
नवीन विहिरी आणि कूपनलिका खोदण्यावर बंदी घालण्याचा निर्णय प्रत्येक जिल्ह्यातील पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्याऐवजी राज्य सरकारनेच सर्व जिल्ह्यांसाठी एकसमान धोरण आखावे, असे मत फुंडकर यांनी व्यक्त केले. पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता, राज्यभर अशा प्रकारचे निर्बंध लागू करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या सुधारित आदेशात सार्वजनिक जलस्रोतांमधून पाणी उपसा करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा राखून ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. काही सार्वजनिक बांधकामांमध्ये पाण्याच्या वापरावर तात्पुरती बंदी घालण्याची तरतूदही करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
