मुंबई : राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र येथे कमाल तापमानात मागील काही दिवसांत लक्षणीय वाढ झाली असून अनेक भागात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना तीव्र उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान,मागील तीन दिवस विदर्भात सरासरी तापमानाहून अधिक कमाल तापमानाची नोंद होत असून बुधवारी येथे ४४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.राज्यात सध्या काही भागात उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती आहे तर काही भागात उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होत. त्यामुळे अनेक भागातील कमाल तापमानात वाढ झाली आहे.

प्रतिचक्रवाती स्थितीमुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे, असे हवामान विभागाने सांगितले. प्रतिचक्रवाती स्थितीमुळे हवेचे प्रवाह जमिनीकडे येतात. तसेच हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. निरभ्र आकाशामुळे सूर्याकडून येणारी किरणे अधिक तीव्रतेने जमिनीकडे येतात आणि या सगळ्या कारणांमुळे तापमानात वाढ होते, असेही हवामान विभागाने सांगितले. पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज असून त्यामुळे नागरिकांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार आहे. पुढील चार दिवसात राज्यातील काही भागातील कमाल तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कमाल तापमान ४४ ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. तर पुढील दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमान सरासरी तापमानाहून २ ते ३ अंश अधिक नोंदले जात असून बुधवारी मालेगाव येथे ४३. २ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. विदर्भातील बहुतांश भागात मागील काही दिवसांपासून लक्षणीय वाढ झाली असून बुधवारी अकोला ४४.२, अमरावती ४४, नागपूर ४३.३, वर्धा येथे ४३,९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

वादळी पावसाचा इशारा कुठे ?

हवामान विभागाकडून १८ एप्रिल रोजी सोलापूर, धाराशिव आदी भागात तर १९ एप्रिल रोजी सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव आदी भागात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान ताशी ३० ते ४० किलोमीटर वाऱ्यांसह मध्यम हे हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुंबईसह कोकण पट्ट्यात उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होत आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. दुपारच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना उन्हाचे चटके जाणवतात. त्यामुळे सध्या उष्णतेमुळे नागरिकांना अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, गुरुवारीही कोकण प्रदेशातील सर्वच जिल्ह्यांना उष्ण आणि दमट वातावरणामुळे हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मुंबईत हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात बुधवारी ३४.५ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्रात ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, शहरात गुरुवारी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सध्या वातावरणाच्या

३ ते ५ किमी अंतरावर प्रतिचक्रवाती स्थिती निर्माण झाली असल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. यामुळे विदर्भांसह, मराठवाडा आणि मध्य महाराष्टातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर काही ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.- एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, हवामान विभाग, पुणे