मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उप महापौर अलका केरकर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी आहे.

सलग तीन वेळा मुंबई महापालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या अलका केरकर या भाजपच्या ज्येष्ठ व अनुभवी नगरसेविका होत्या. त्या वांद्रे पश्चिमच्या प्रभाग क्र. ९८ मधून यावेळी निवडून आल्या होत्या. मुंबई महानगरपालिका नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर त्या महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या आघाडीच्या उमेदवारांपैकी एक होत्या.

अलका केरकर यांच्या निधनामुळे पालिका वर्तुळात तसेच भाजपच्या लोक प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांची अंत्ययात्रा  मेफेयर अपार्टमेंट, १७ वा रस्ता, शिवाजी नगर समोर, खार पश्चिम येथील राहत्या घरापासून सकाळी ११ वाजता निघणार आहे.  हिंदू स्मशानभूमी, शास्त्री नगर सांताक्रूझ प येथे १२ वाजता अंतिम संस्कार होतील, असे भाजप पक्ष कार्यालयातर्फे कळवण्यात आले आहे.

आमदार आशिष शेलार यांच्याकडून श्रद्धांजली..

अलका केरकर यांच्या निधनानंतर आमदार ऍड आशिष शेलार यांनी समाज माध्यमावर दुःख व्यक्त केले असून त्यांनी म्हटले आहे की, अलका केरकर यांनी निवृत्त शिक्षिका म्हणून  अत्यंत साधे जीवन जगले. पक्षनिष्ठा जपत त्यांनी प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेचे सर्वोच्च निकष कायम ठेवले. भ्रष्टाचार किंवा कोणत्याही अनधिकृत गोष्टींना त्यांनी कधीही थारा दिला नाही. आपल्या निःस्वार्थ सेवाभावामुळे आणि जनतेच्या कल्याणासाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे त्या सर्वांच्या आदराच्या पात्र ठरल्या. त्यांच्या कार्यामुळे इतर नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसाठी एक आदर्श निर्माण झाला. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांप्रती त्यांची असलेली बांधिलकी वांद्रे पश्चिम मतदारसंघासाठी मोठी हानी ठरली आहे, अशा शब्दात ऍड आशिष शेलार यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

अलका केरकर यांच्याविषयी..

अलका केरकर यांनी २०१४-२०१५ दरम्यान मुंबईच्या उपमहापौरपदाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच २०२६ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वांद्रे पश्चिम (वॉर्ड ९८) मधून महायुतीच्या (भाजप-शिवसेना-रिपाई) उमेदवार म्हणून विजय मिळवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या कार्यकर्त्यां होत्या.