एकेकाळी कापसासह व्यापारी केंद्र असलेल्या दक्षिण मुंबईतला हा परिसर आता निसर्गाचा सुकून, आर्ट डेको धाटणीच्या हेरिटेज वास्तू, ऐतिहासिक संस्था आणि जुन्या मुंबईची आठवण करुन देतो.

अलीकडेच कॉफी विथ करण कार्यक्रमात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना सहभागी झाले होते. त्यावेळी मुंबईतल्या हॉर्निमन सर्कलबाबत दोघांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विजयने उत्तर दिलं. त्यावर करणने हॉर्निमल सर्कल म्हणजे मुंबईतल्या फोर्ट भागातला परिसर असल्याचं दोघांना सांगितलं.

‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमाचा शेवटचा हंगाम सुरू आहे. या दोघांचं लग्न सोशल मीडियावर अनेक दिवस ट्रेंड होत होतं. दोघांचाही प्रचंड असा चाहतावर्ग आहे. कार्यक्रमात करणने प्रश्न विचारला की हॉर्निमन सर्कलला तुम्हाला कोण भेटतं? विजयला मुंबईतल्या या जागेबद्दल काहीच माहिती नव्हती. हॉर्निमन नाव ऐकल्याने त्याला हॉर्नी शब्द आठवला. पण त्याचा अर्थ अगदीच वेगळा होतो. रश्मिकालाही या भागाची माहिती नव्हती. हॉर्निमल सर्कल म्हणजे काय असा प्रश्न तिनेही विचारला. हॉर्निमलचं स्पेलिंग काय आहे असं विजयने विचारलं. त्यावर करणने स्पेलिंग सांगितलं. इथे कोण भेटतं? या मूळ प्रश्नाला विजयने हॉर्नी पीपल असं उत्तर दिलं. जे अर्थातच चुकीचं होतं कारण त्याला या ठिकाणाचा सामाजिक संदर्भ ठाऊक नव्हता. विजयच्या उत्तरावर करण आणि रश्मिका खळखळून हसले. हसून झाल्यावर करणने उत्तर सांगितलं- माणसं, खूप सारी माणसं.

ब्रिटिश वसाहती काळाची आठवण करून देणारा असा हा परिसर आहे. दक्षिण मुंबईतल्या गजबजलेल्या आर्थिक उलाढालींचं केंद्र, वर्तुळाकार बाग आणि त्याभोवतालच्या इमारती यातून बॉम्बेचा व्यापारी बंदर ते व्यापारव्यवसायाचं केंद्र हा प्रवास उलगडतो.

बाग म्हणून अस्तित्वात येण्यापूर्वी हा भाग ‘मुंबई ग्रीन’ म्हणून प्रसिद्ध होता. तत्कालीन मुंबईतले व्यापारी एकत्र जमत. कापूस तसंच अफूची गोदामं होती. व्यावसायिक केंद्र म्हणून उदयास येण्यात या मैदानाने मोठी भूमिका बजावली आहे. वडाच्या झाडाखाली व्यापारी, दलाल एकमेकांना भेटत असत.

बॉम्बे वाढत गेलं तसं हा भाग बदलत गेला. १८६०मध्ये शहरातल्या जुन्या किल्ल्याच्या तटबंदी पाडून टाकण्यात आल्या. बॉम्बे ग्रीन हा शहराच्या नियोजन प्रक्रियेचा भाग झाला. १८६९ ते १८७२ या कालावधीत वर्तुळाकार बगीचा उभारण्यात आला. वळणदार पॅटर्नची दालनं आणि वॉकवे असणाऱ्या इमारती भवतालात आहेत. सुरुवातीला या भागाला एलफिन्स्टन सर्कल असं नाव देण्यात आलं होतं. मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड एलफिन्स्टन यांच्यावरून हे नाव देण्यात आलं होतं.

१९४७ मध्ये द बॉम्बे क्रॉनिकलचे संपादक बेंजामिन हॉर्निमन यांच्या कार्याची दखल घेत याला हॉर्निमन सर्कल असं नाव देण्यात आलं. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला हॉर्निमन यांनी नेहमीच पाठिंबा दिला. ब्रिटिशांच्या सेन्सॉरशिपला त्यांनी विरोध केला. १९१९ जालियनवाला बाग हत्याकांडासंदर्भात वृतान्त छापल्याप्रकरणी त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आलं.

बागेभोवती ऐतिहासिक वास्तूंची महिरप असावी असं या परिसरात गेल्यावर वाटतं. १९व्या शतकातला हा व्यापारी भाग पण तरीही इथे शांतता जाणवते. महानगरीय कल्लोळातला एक सुकून कोपरा असंच याचं वर्णन करावं लागेल. चालण्याचा आनंद घेता येईल असे वॉकवे, बसायला नक्षीदार बाकं, काम करता करता थोडा विरंगुळा विश्राम अशी ही जागा. सार्वजनिक व्यवस्थेत बागेचे स्थान किती आवश्यक आहे याचं महत्त्व ठसवणारी ही जागा.