scorecardresearch

अग्निसुरक्षेसाठी एक पाऊल पुढे ; अग्निशमन दलाच्या अ‍ॅपवर मुंबईतील सर्व इमारतींची नोंद

आतापर्यंत एखाद्या इमारतीची तपासणी यादृच्छिक पद्धतीने केल्यानंतर त्याची माहिती कागदावर नोंदवून ठेवली जात होती.

मुंबई : अग्निशमन दलाने अग्नी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबईतील सर्व इमारतींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी ‘बिल्डिंग इन्स्पेक्शन सिस्टिम’ हे नवे सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये मुंबईतील इमारतींबाबतच्या सर्व नोंदी नमूद करण्यात येणार आहेत. तसेच अग्निरोधक यंत्रणा कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबतही सोसायटय़ांना ऑनलाइन पद्धतीने नोटीस पाठविता येणार आहेत.

महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ नुसार इमारतीमध्ये बसवण्यात आलेली स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा कार्यक्षम स्थितीत ठेवण्याची जबाबदारी संबंधित इमारतीचे मालक, भोगवटादार यांची आहे. मात्र, मुंबईत आगीची दुर्घटना घडल्यानंतर संबंधित इमारतीमधील अग्निरोधक यंत्रणा कार्यरत नव्हती, सोसायटीने अग्निरोधक यंत्रणेची तपासणी केल्याचे प्रमाणपत्र सादर केलेच नव्हते अशा गंभीर बाबी पुढे येतात. त्यानंतर मग इमारतीची तपासणी केली जाते व नोटीस पाठवली जाते. आतापर्यंत ही सगळी कामे कागदोपत्री होत होती. मात्र, अग्निशमन दलाने अद्ययावत पद्धतींचा अवलंब करण्याचे ठरवले आहे. त्याकरिता ‘बििल्डग इन्स्पेक्शन सिस्टीम’ हे नवीन सॉफ्टवेअर असलेले अ‍ॅप तयार केले आहे.

मुंबईत साधारणत: तीन लाख इमारती असून या सगळय़ा इमारतींपर्यंत पोहोचणे अग्निशमन दलाला मनुष्यबळाअभावी शक्य नाही. आतापर्यंत एखाद्या इमारतीची तपासणी यादृच्छिक पद्धतीने केल्यानंतर त्याची माहिती कागदावर नोंदवून ठेवली जात होती. मात्र, अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या की दरवेळी या माहितीची शोधाशोध करावी लागते. त्यामुळे या सर्व इमारतींची माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी या हेतून हे अ‍ॅप विकसित करण्यात आल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी दिली. त्यामुळे हळूहळू येत्या काळात मुंबईतील सर्व इमारतींची माहिती या अ‍ॅपवर उपलब्ध होऊ शकणार आहे.

नोटिशीची मुदत संपली की स्मरण

एखाद्या इमारतीला अग्निरोधक यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी ३०, ६० किंवा १२० दिवसांची नोटीस देण्यात येते. ही मुदत संपल्यानंतर संबंधित सोसायटीला त्याचे अ‍ॅपद्वारे मेल करून स्मरण  करून दिले जाणार आहे.

अ‍ॅपचे कामकाज असे

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी एखाद्या इमारतीची तपासणी केली की त्याची इत्थंभूत माहिती या अ‍ॅपमध्ये नोंदवली जाणार आहे. तसेच त्यात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, त्यांचे ई-मेलही नोंदवले जाणार आहे. त्यांना दर सहा महिन्यांनी अग्निरोधक यंत्रणा कार्यरत असल्याचा बी फॉर्म भरण्याबाबत मेलद्वारे आठवण करून दिली जाणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: All buildings in mumbai register on the fire brigade app zws

ताज्या बातम्या