मुंबई उपनगरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढत जाणारी संख्या आणि त्यामुळे लोकल गाड्यावर पडणारा ताण पाहता आता सर्व लोकल गाड्या १५ डब्यांच्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी तशा सुचना मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गोयल यांची बैठक झाली. यामध्ये गोयल यांनी लोकल गाड्या १५ डब्यांच्या करण्याच्या सुचना त्यांना दिल्या आहेत. त्यासाठी दोन आठवड्यात योजनबद्ध आराखडा सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

१५ डब्यांची लोकल केल्यानंतर ट्रेनमध्ये चढताना होणारी गर्दी, त्यामुळे होणारी धक्काबुक्की, वाद-विवाद आणि अनेक वेळा होणारे अपघात या अनुभवातून अल्पशी सूटका होत मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळणार आहे. लोकलचे डब्यांमध्ये वाढ केल्याने मुंबई रेल्वेची कार्यक्षमता २५ टक्क्यांनी सुधारू शकते असेही रेल्वे मंत्री म्हणाले. सर्वात प्रथम मध्य आणि पश्मिच रेल्वेच्या जलद मार्गावर १५ डब्यांच्या लोकल धावतील. यानंतर धीम्या मार्गावरही सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

पश्चिम रेल्वेवरील १२ डब्यांच्या गाड्यांची क्षमता तीन हजार प्रवासी वाहून नेण्याची असताना गर्दीच्यावेळी लोकलमधून ५,५०० पेक्षा आधीक लोक प्रवास करतात. तर १५ डब्यांच्या गाड्यांची प्रवासी वाहन क्षमता ही ४, २०० इतकी आहे. पण या गाड्यांमधून सुमारे ७ हजार प्रवासी गर्दीच्या वेळी प्रवास करतात. म्हणजे गर्दीच्या वेळी डब्यातील फक्त एका स्क्वेअर मीटरमध्ये तब्बल १६ जण प्रवास करतात असे रेल्वेच्या लक्षात आले आहे.