मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीत एरव्ही शैक्षणिक किंवा शिक्षकांच्या प्रश्नांभोवती प्रचार केंद्रित असतो. मात्र, यंदा पाच मतदारसंघांत राजकीय नाटय़मय घडामोडींनी निवडणुकीत रंगत आणली आहे. या निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस या प्रमुख पक्षांना उमेदवार आयात करावे लागले असून, आर्थिकदृष्टय़ा तुल्यबळ उमेदवार रिंगणात आहेत.
विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांतील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपली. नाशिक पदवीधर आणि नागपूर शिक्षक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतच उमेदवारीवरून गोंधळ झाला. नाशिक मतदारसंघात काँग्रेसने सत्यजित तांबे यांना उमेदवारी नाकारली, तर त्यांचे वडील व विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. त्यातून काँग्रेसचे सारे गणित बिघडले. नाशिकमध्ये काँग्रेसचा उमेदवारच रिंगणात राहिलेला नाही. दुसरीकडे, सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्यास काँग्रेसने नकार दिला. या साऱ्या घडामोडी घडत असतानाच निवडणुकीच्या आधी उमेदवारीसाठी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शुभांगी पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर त्यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला. नाशिकचा घोळ निस्तरताना नागपूर शिक्षक मतदारसंघात उमेदवारीवरून महाविकास आघाडीत गोंधळ वाढला. आघाडीत नागपूर शिक्षक हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला होता. मात्र, नाशिकमध्ये शिवसेनेने अपक्षाला समर्थन देण्याच्या बदल्यात नागपूर मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात आला. नागपूर शिक्षकमध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांशी संबंधित शिक्षक आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आपला अर्ज कायम ठेवला. शेवटी काँग्रेसपुरस्कृत उमेदवार, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला. यामुळे आता काँग्रेस व राष्ट्रवादीचे बंडखोर रिंगणात असतील.
प्रत्येक वेळी शिवसेना माघार घेणार नाही : संजय राऊत</strong>
महाविकास आघाडीत समन्वय ठेवण्याची जबाबदारी सर्व घटक पक्षांची आहे. प्रत्येक वेळा शिवसेना माघार घेणार नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसमध्ये झालेल्या घोळामुळेच नाशिक व नागपूर मतदारसंघांत आदलाबदल करावी लागली. काँग्रेसने हा विषय योग्यपणे हाताळणे आवश्यक होते. काँग्रेसच्या चुकीमुळेच महाविकास आघाडीत नाहक गोंधळ झाल्याचा ठपकाही राऊत यांनी ठेवला.
लढत अशी..
नाशिक पदवीधर : भाजपचे पाठबळ मिळण्याची अपेक्षा असलेले सत्यजित तांबे आणि शिवसेना पुरस्कृत शुभांगी पाटील यांच्यात लढत.
नागपूर शिक्षक : भाजपप्रणीत नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, काँग्रेसचे अडबाले यांच्यात तिरंगी सामना.
कोकण शिक्षक : शेकापचे बाळाराम पाटील आणि भाजपने िशदे गटाकडून आयात केलेले उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही उमेदवार आर्थिकदृष्टय़ा तुल्यबळ.
औरंगाबाद शिक्षक : राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात चुरस.
अमरावती पदवीधर : भाजपचे विद्यमान आमदार डॉ. रणजित पाटील आणि काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांच्यात थेट लढत.