Mumbai Municipal Corporation Mayor Election: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांना मुंबईत थांबण्याचे आदेश सर्व राजकीय पक्षांनी दिले आहेत. महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या ११ फेब्रुवारीला होणार आहे. तत्पूर्वी मुंबई सोडू नये असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र ९ फेब्रुवारीला आंगणेवाडीची जत्रा असून त्याकरीता कोकणपट्ट्यातील अनेक नगरसेवक बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागून पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळाचे आणि मुंबईकरांचे लक्ष महापौर कोण होणार याकडे लागले आहे. श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक येत्या ११ फेब्रुवारीला होणार आहे. तर शनिवारी ७ फेब्रुवारीला महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज करण्यात येणार आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाची गटनोंदणी सोमवारी पार पडली आहे. तर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या तीन नगरसेवकांची नोंदणी बुधवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ११ फेब्रुवारीला निवडणूक घेण्याचे निश्चित झाले आहे. त्याच्या तीन दिवस आधी उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाते. उमेदवारांना ७ फेब्रुवारीला अर्ज भरता येणार आहे. तर विशेष सभेच्या पंधरा मिनिटे आधी अर्ज मागे घेता येणार आहे. यंदाचे महापौर पद हे सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित असून बहुप्रतीक्षित अशी ही निवडणूक आता लवकरच होणार आहे.

शिवसेना (ठाकरे) पक्षाला या निवडणुकीत बहुमत मिळालेले नसले तरी या पक्षानेही सावधगिरी बाळगत नगरसेवकांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुंबई सोडू नका, मुंबईबाहेर जाऊ नका असे आदेश दिले आहेत. तर भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षानेही आपल्या नगरसेवकांना मुंबई न सोडण्याचे आदेश दिले आहेत. ८ फेब्रुवारीला रविवार आहे. त्यामुळे अनेक नगरसेवक आंगणेवाडीच्या जत्रेला जाण्याची शक्यता आहे. परंतु, बाहेरगावी गेलात तरी १० फेब्रुवारीला मुंबईत असणे आवश्यक आहे असे आदेश दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांना देण्यात आले आहेत.

पालिकेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ८९ जागा मिळाल्या. तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाला २९ जागा मिळाल्या. शिवसेना (ठाकरे) पक्षाला ६५ जागा, तर मनसेला सहा जागा मिळाल्या.

शिवसेना (ठाकरे), मनसे, कॉंग्रेस, एमआयएम या पक्षांनी कोकण भवन आयुक्तांकडे जाऊन आपली गटनोंदणीही केली. मात्र स्पष्ट बहुमत मिळालेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे) या पक्षांनी अद्याप आपली गटनोंदणी केलेली नव्हती. स्वतंत्र गटनोंदणी करायची की संयुक्त गटनोंदणी करायची यावरून या दोन पक्षांचे गटनोंदणीचे घोडे अडकले होते. अखेर सोमवारी या दोन्ही पक्षांची स्वतंत्र गटनोंदणी झाली. त्यामुळे आता महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीला वेग आला आहे.