राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने साथरोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ब्रेक द चेनचे आदेश नवीन नियम जारी केल्यानंतर, आता मुंबईतील नियमांसदर्भातही निर्णय झाला आहे. त्यानुसार मुंबईतील सर्व दुकाने आठवड्यातील सर्व  दिवस आता रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर, हॉटेल, रेस्टॉरंट सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे. ब्रेक द चेन अंतर्गत मुंबई महापालिकेने सुधारित नियमावली आता जाहीर केली आहे. त्यामुळे निर्बंधांच्या शिथिलतेबाबत मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. हे नवीन नियम उद्यापासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत.

तसेच, मेडिकल व केमिस्ट दुकाने आठवड्यातील सर्व दिवस २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. तर, जलतरण तलाव आणि निकट संपर्क येऊ शकतो असे क्रीडा प्रकार वगळून अन्य इनडोअर व आउटडोअर खेळांस आठवड्याचे सर्व दिवस नियमित वेळेनुसार परवानगी असेल. चित्रीकरण नियमीत वेळेनुसार करण्यास परवानगी दिली गेली आहे.

Maharashtra Unlock : नवी नियमावली जाहीर ; पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम!

तर, ५ व १८ जून रोजी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशातील इतर तरतुदी पुढील आदेशापर्यंत जशाच्या तशा लागू राहणार आहेत. करोना प्रतिबंधात्मक नियमानुसार सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर व इतर उपाययोजना अनिवार्य असणार आहे. वरील आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शवल्यास संबंधितांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त आय.एस. चहल यांच्या स्वाक्षरीनिशी हे आदेश काढण्यात आले आहे.