मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध केंद्रांवर सुरू होत्या. परंतु महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांमध्ये बेमुदत संप पुकारल्यामुळे सदरच्या परीक्षा ३ फेब्रुवारीपासून स्थगित करण्यात आल्या होत्या.
आता या सर्व परीक्षा ६ फेब्रुवारीपासून पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे. तर ३ व ४ फेब्रुवारी रोजी स्थगित झालेल्या सर्व परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीसोबत चर्चा सुरू असतानाच शिवाजी विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाने शासनास पूर्वकल्पना न देता विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या दोन्ही विद्यापीठांना ३ फेब्रुवारी रोजी एका पत्रकाद्वारे जाब विचारला होता. ‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील तरतुदींनुसार विहित वेळेत परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी ही विद्यापीठांची आहे आणि त्यामुळे विद्यापीठाने आवश्यक त्या उपाययोजना करून परीक्षा विहित वेळेत घेण्यासाठी उपाययोजना कराव्या’, असे या पत्रकातून दोन्ही विद्यापीठांच्या प्रशासनास सांगण्यात आले होते.