मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआरडीए) न विकल्या गेलेल्या घरांची संख्या वाढल्याचं चित्र दिसत आहे. करोना लॉकडाउनमुळे घरांची विक्री मंदावली होती. मात्र आता अनलॉकदरम्यान नव्याने प्रकल्पांची घोषणा होत असल्याने गृहविक्री व्यवसायाला पुन्हा भरभराट येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

एमएमआरडीए रिजनमध्ये येणाऱ्या दहिसर, पनवेल, कल्याण, भिवंडी, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर सारख्या ठिकाणी न विक्री झालेल्या घरांची संख्या फारच जास्त आहे. मुंबई आणि उपनगर परिसरामधील एकूण न विक्री झालेल्या २ लाख ८१ हजार ६०१ तयार घरांपैकी १ लाख २७ हजार ६६० म्हणजे जवळजवळ ५० टक्के घरे ही याच भागांमधील आहेत.

ऑगस्ट २०२० पासून घरांची विक्रमी विक्री होत असली तरी विक्री अभावी पडून असलेल्या तयार घरांची संख्याही १७ टक्क्यांनी वाढली आहे. एप्रिल २०२० च्या सुमारास तयार असलेली सगळी घरं विकली जाण्याचा कालावधी ११ वर्ष होता, जो मार्च २०२१ च्या सुमारास चार वर्ष इतका कमी झाला. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये नवनवीन प्रकल्पांच्या घोषणा होत असून पुन्हा एकदा विक्रीअभावी तयार घरं पडून राहण्याचा कालावधी चार वर्ष ११ महिने इतका झाला आहे.

तिसऱ्या लाटेमुळे विक्रीला पुन्हा एकदा ब्रेक लागू शकतो आणि सरासरी विक्रीची संख्या कमी होऊ शकते अशी शक्यता लायसिस फोरासचे कार्यकारी निर्देशक पंकज कपूर यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना व्यक्त केलीय. मागील वर्षी घरांची सर्वाधिक विक्री नवी मुंबई, मध्य उपनगरे, पश्चिम उपनगरांमध्ये झालीय. नवीन प्रकल्प आल्याने तयार झालेल्या मात्र विक्री न करण्यात आलेल्या घरांची संख्या या भागांमध्ये वाढल्याचं कपूर सांगतात.

पुढील काही तिमाहींमध्ये हे गणित असेच राहणार असल्याची शक्यता कपूर यांनी व्यक्त केलीय. आगामी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात गृहविक्री होईल त्यामुळे एमएमआरमधील विक्री न झालेल्या घरांची संख्या कमी होईल असा अंदाज कपूर यांनी व्यक्त केलाय.

या क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार तयार घरांची मागणी वाढताना दिसत आहे. बांधकाम सुरु असणाऱ्या घरांपेक्षा ग्राहकांकडून रेडी टू मूव्ह घरांची मागणी अधिक प्रमाणात होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेच हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर बांधकाम व्यवसायिकांचं लक्ष्य असून नवीन प्रकल्प जाहीर करण्यासाठी सध्या फारसं कोणी उत्सुक नाहीय.

रिअल इस्टेट बुकींग रिसर्च फर्म असणाऱ्या अॅनारॉक रिसर्चच्या आकडेवारीनुसार तयार घरांच्या विक्रीला प्राधान्य देण्याचा ट्रेण्ड २०२३ पर्यंत दिसून येईल. “२०१९ च्या आकडेवारीशी तुलना केली तर २०२३ मध्ये घरांचा पुरवठा हा ११ टक्क्यांनी वाढेल तर विक्रीत २२ टक्क्यांनी वाढ होईल,” अशी शक्यता या कंपनीचे अध्यक्ष अनूज पुरी यांनी व्यक्त केलीय.