राज्यात विविध ठिकाणी पडलेला अवकाळी पाऊस, गारपीट यांचा परिणाम कोकणातील हापूस आंब्यावर मोठय़ा प्रमाणात जाणवू लागला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुर्भे येथील घाऊक फळ बाजारात वाढणारी आवक या वर्षी मात्र मंदावणार आहे. कोकणातून मंगळवारी २८ हजार हापूस आंब्याच्या पेटय़ा या बाजारात आल्याची नोंद आहे. बुधवारी ही संख्या आठ हजारने कमी झाली. मोसमातील एकूण आवक वीस टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे. सध्या बाजारात हापूस आंब्याचा दर प्रति डझन २०० ते ९०० रुपये असा आहे. एप्रिल-मेमध्ये आवक आणखी घटेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यंदा कोकणात या वर्षी नेहमीपेक्षा केवळ ४० टक्के उत्पादन झाल्याची चर्चा होती. त्यात अवकाळी पाऊस, मराठवाडा, विर्देभात झालेली गारपीट, यामुळे निर्माण झालेल्या थंड हवामानाचा हापूस आंब्याच्या परिपक्वतेवर परिणाम झाला आहे. हापूस आंब्याला या काळात कडक उन्हाची आवश्यकता असते. त्याच्या विपरीत हे हवामान असल्याने फळांचा आकार वाढत नाही. त्यामुळे गुणवत्ता असलेला हापूस घाऊक बाजारात येईनासा झाल्याने त्याचा परिणाम निर्यातीवर झाला आहे. अनेक ठिकाणी करपा रोगाने आंब्याला डाग पडू लागले आहेत. हा डागाळलेलला आंबा बाजारात २०० रुपये डझनाने विकला जात आहे. सध्या बाजारात येणाऱ्या आंब्याला प्रति डझन २०० ते ९०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे चांगल्या एका हापूसची किंमत ७५ रुपये आहे. बदलत्या ऋतुचक्रामुळे या वर्षी एप्रिल-मे महिन्यातही हापूस आंबा कमी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हापूस आंब्याच्या संपूर्ण मोसमात ६० ते ७० लाख पेटय़ा येत असल्याची नोंद आहे. या वर्षी तो केवळ २० टक्के येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हापूस आंब्याचे उत्पन्न या वर्षी घटले आहे. त्यात अवकाळी पावसाने कहर केल्याने आंब्याचा दर्जा मिळत नाही. त्याचा युरोपमधील निर्यातीवर परिणाम होत आहे. या वर्षी बागायतदार आणि व्यापारी दोघेही हवालदिल आहेत. एप्रिल -मे महिन्यात दरवर्षीप्रमाणे आवक होणार नाही. त्यामुळे आंब्याच्या किंमती साहजिकच वाढणार आहेत.
– संजय पानसरे, आंबा व्यापारी
* अवकाळी पावसाचा फटका *  सध्या एक आंबा ७५ रुपये *  एप्रिल, मेमध्ये आवक आणखी घटणार