पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत पाच हजार प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय

नमिता धुरी
मुंबई : मुसळधार पाऊस पडूनही मुंबईला भेडसावणारा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने वातावरण कृती आराखडय़ांतर्गत उपाययोजना करण्यास सुरुवात के ली असून पाच हजार पर्जन्यजल संचयन प्रकल्प मुंबईत पुढील काही महिन्यांत कार्यान्वित होणार आहेत.

वाढत्या लोकसंख्येचा परिणाम म्हणून मुंबईतील प्रदूषणात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. बिघडलेल्या वातावरण व्यवस्थेचे परिणाम आता मुंबईला जाणवू लागले आहेत. भूपृष्ठाचे तापमान वाढल्याने हवेतील उष्णताही वाढली आहे. पावसाचे वेळापत्रक बिघडले आहे. पावसाळ्यातील काही दिवस अत्यंत कोरडे जात असल्याने पालिकेला पाणीकपात करावी लागते. दुसऱ्या बाजूला मोठय़ा कालावधीत अपेक्षित असलेला पाऊस काही तासांमध्ये पडत असल्याने पूरस्थिती ओढवते. अशा स्थितीमध्ये होणारी आर्थिक आणि जीवितहानी टाळण्यासाठी पर्जन्यजल संचयन प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले जाणार आहे.

प्रकल्प कसा असेल?

पालिकेच्या १ हजार ४० उद्यानांमध्ये प्रत्येकी ५ शोषखड्डे तयार केले जातील. त्यानंतर पोलीस ठाणे, अग्निशमन के ंद्रे आणि विंधन विहिरी (बोअरवेल) येथेही शोषखड्डे तयार करण्याचा मानस आहे. शंभरहून अधिक पालिका शाळांमध्ये यापूर्वीच हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पाची मूळ संकल्पना शुभजीत मुखर्जी यांची असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका हा प्रकल्प राबवत आहे. ‘मुंबईकर त्यांचे ३५ टक्के  पाणी रोज सकाळी केवळ शौचालयासाठी वापरतात. मुंबईत पाण्याची कमतरता नाही; मात्र पाण्याचा अपव्यय बराच होत असल्याने पाणीकपात करावी लागते’, असे मुखर्जी यांनी सांगितले.

गरज आणि फायदे

मुंबईत मोठय़ा प्रमाणावर झालेल्या काँक्रीटीकरणामुळे पाणी जमिनीत झिरपत नाही. त्यामुळे भूजल पातळी खालावत आहे. सिमेंट काँक्रीट उष्णता धरून ठेवत असल्यामुळे भूपृष्ठावरील वातावरणही तापते. परिणामी प्राणवायूचे प्रमाण कमी होते. पावसाचे पाणी जमिनीत झिरपल्याने समुद्राचे पाणी मागे ढकलले जाते; मात्र पावसाचे पाणी न झिरपल्याने समुद्राचे पाणी जमिनीच्या खालच्या थरात झिरपते. त्यामुळे झाडांची मुळे कमकुवत होतात. पर्जन्यजल संचयनामुळे भूजल पातळी वाढेल, वातावरणही थंड राहील, झाडांची मुळे बळकट होतील, पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाल्याने पूरस्थिती नियंत्रणात राहील.

स्वरूप कसे?

६ फूट खड्डा खणून त्याच्या मधोमध ४ फु टांचा ड्रम ठेवला जातो. ड्रमच्या भोवताली व खाली खडी टाकली जाते. ड्रमला सर्व बाजूंनी बारीक छिद्रे पाडली जातात. तसेच छतावरून वाहणारे पाणी पीव्हीसी वाहिनीद्वारे ड्रमात सोडले जाते. ड्रमच्या भोवताली साचणारे पाणी दगडांमधून पाझरत ड्रमात उतरते. ड्रमात पाणी साचून न राहता ते छिद्रांमधून खालच्या खडीमध्ये उतरते व हळूहळू जमिनीत पाझरते.