शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जनधन खात्याचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. तसेच ६० टक्के लोकांची जनधन खाती बँकेत उघडताना मोदींनी पैसे भरले होते का, असा प्रश्न विचारला. ते शनिवारी (२४ सप्टेंबर) नवी मुंबईत गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आले असताना पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. मोदी सरकारच्या जनधन खाते योजनेवर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, "६० टक्के लोकांची बँकेत खाती उघडली म्हणजे मोदींनी स्वतःच्या पैशाने ही खाती उघडली का? जनतेने स्वतःच्या पैशातून ही जनधन खाती उघडली आहेत. आज जनधन खात्याची स्थिती काय आहे. हा पैसा कोण वापरतो आहे. या खात्याचा जनतेला फायदा काय." "खातं उघडलं म्हणजे चंद्रावर फार मोठे दिवे लावले की काय" "खातं उघडलं म्हणजे त्यांनी चंद्रावर फार मोठे दिवे लावले की काय. उलट त्यांनी जनतेला या खात्यावर १५ लाख रुपये टाकू. या आश्वासनाचं काय झालं याचं उत्तर अमित शाहांनी द्यावं. होते त्याचे काय झाले?" असा प्रश्नही अंबादास दानवेंनी विचारला. व्हिडीओ पाहा : "रात्री बेरात्री बैठका घेणारे गद्दार" अंबादास दानवे म्हणाले, "रात्री बेरात्री बैठका घेणारे गद्दार लोक आहेत. त्यांच्याविषयी गणरायासमोर जास्त बोलू नये. गणराया योग्यप्रकारे सोंड फिरवेल आणि गद्दारांना धडा शिकवेल." हेही वाचा : “मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची तिरडी बांधली आहे, आता फक्त…”; संजय राऊतांचा हल्लाबोल "नवी मुंबईतील अनेक डोंगर लोकांनी खोदले" "पर्यावरणाच्या रक्षणासाठी असे देखावे साकारणे गरजेचे आहे. मुंबई नवी मुंबईतील पर्यावरण हा मोठा प्रश्न आहे. नवी मुंबईतील अनेक डोंगर लोकांनी खोदले. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. पर्यावरण जपण्याची गरज आहे," असंही मत अंबादास दानवेंनी व्यक्त केलं.