मुंबई : मिसिंग लिंकवरून महाराष्ट्राची बदनामी करू नका, असे विरोधकांना सुनावणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) आमदार अंबादास दानवे यांनी गुरूवारी विधान परिषदेत घेतला.
फडणवीस यांचा अपमान म्हणजे काय महाराष्ट्राचा अपमान का, असे विचारत हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा, जिजाऊंचा, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचा असून आपण इथले नागरिक आहात, हे विसरू नका, असे दानवे यांनी ठणकावले. नगरविकास, महसूल, कायदा-सुव्यवस्था अशा सर्वच विभागांच्या कारभाराचे वाभाडे काढत, महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचे थैमान घातल्याचा आरोप दानवे यांनी केला.
मिसिंग लिंकवरून फडणवीस यांना विरोधक लक्ष्य करत आहेत. त्यांना उत्तर देताना महाराष्ट्राला बदनाम करू नका, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केले होते. त्याचा जोरदार समाचार दानवे यांनी घेतला. चंद्रावर पाठविलेल्या चांद्रयानाकरिता फक्त ६१५ कोटी लागले. पण, अवघ्या १३ किलोमीटरचा मिसिंग लिंक तब्बल ७ हजार १८१ कोटींचा आहे. म्हणजे एका किलोमीटरसाठी ५४० कोटी. तोही अवघ्या ६६ दिवसात दरड कोसळून पडतो. मुख्यमंत्री १८ तासात दरड काढल्याचे सांगतात. इराणने तीन दिवसात अमेरिकेने पाडलेला पूल बांधून दाखविला. तुम्ही दरड हटवली तर काय तीर मारला का, अशी विचारणा दानवे यांनी केली.
हा रस्ता प्रतितास २४० किलोमीटर वेगाचे वारेही सहन करू शकेल, असा दावा केला जात होता; प्रत्यक्षात ९० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यांचाही मारा झेलू शकला नाही. तुमच्या काळात अटल सेतूला चिरा पडतात, कोस्टल रोड गळतो, अशा शब्दात दानवे यांनी महायुती सरकारला लक्ष्य केले. हे सरकार फक्त जाहिरातबाजीत गुंतले आहे. शेतकरी कर्जमाफीचा एक रूपयाही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला नाही. परंतु, सरकारच्या जाहिराती सर्वत्र लागल्या आहेत, अशी टीका त्यांनी केली.
कशाला धरता सत्तेचा अभिमान, इथे जनतेच्या दु:खाला नाही रे वाव, फक्त कागदावर चालतात योजना, प्रत्यक्षात फक्त भ्रष्टाचार आणि घाव, अशा शब्दांत त्यांनी या राज्यातील जनतेची व्यथा मांडली. शेवटी ये दबदबा, ये हुकूमत, ये नश्शा-ए-दौलत, किराया-दार हैं सब घर बदलते रहते हैं! हा बेकल उत्साही यांचा प्रसिद्ध शेर उद्धृत करत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
विरोधकांच्या मागे बाहेरची ताकद – प्रवीण दरेकर
दानवे यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजपचे प्रवीण दरेकर यांनी विरोधकांच्या मागे बाहेरची ताकद असल्याचा आरोप केला. मिसिंग लिंकच्या घटनेचे गलिच्छ, फुटकळ राजकारण करणे शोभत नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांचे नाही तर महाराष्ट्राचे वाभाडे काढत आहात. राज्याला जातीपातीविरहित पारदर्शक कारभार देणाऱ्या, प्रगतीकडे नेणाऱ्या मुख्यमंत्र्यावर टीका करत आहात, असे म्हणत दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले.
