मुंबई : अंबरनाथ नगर परिषदेत शिंदे सेनेने २०० बोगस मतदार आणल्याचा भाजपाचा आरोप आहे. येथेच भाजपच्या उमेदवारांकडून मतदारांना पैसे वाटताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दोघांना पकडून भरारी पथकाच्या ताब्यात दिले आहे. नांदेडच्या धर्माबादमध्ये पैशाचे अमिष दाखवून भाजपने शेकडो मतदारांना कोंडून ठेवत लोकशाहीचा जाहीर लिलाव मांडला आहे, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) सरचिटणीस, आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

लोकशाहीचे अशा प्रकारे वस्त्रहरण होत असताना राज्य निवडणूक आयोग शांत बसला आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्ता मिळवून देण्याच्या मोहात अडकलेला राज्य निवडणूक आयोग ध्रुतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून शांत बसला आहे. हे असेच चालणार असेल तर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याचा फार्स न करता थेट बोली लावूनच भाजपच्या नगरसेवकांना विजयी घोषित करावे. त्यामुळे किमान निवडणुकीसाठी होणारा खर्च तरी वाचेल, असेही पवार यांनी म्हटले आहे.

सत्ताधारी पक्षाचा निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप – सुळे

आजपर्यंत विरोधक, काँग्रेस निवडणूक प्रक्रियेवर, ईव्हीएम यंत्रावर आरोप करीत होती. आताच्या नगर परिषदांच्या निवडणुकीत सत्ताधारी शिंदे सेनेचे कार्यकर्ते ईव्हीएम यंत्रावर, मतदान प्रक्रियेवर आरोप करीत आहेत. त्यामुळे राज्यात निवडणुका पारदर्शकपणे होत आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.