मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत ३ ते ५ डिसेंबर दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘टूर सर्किट’चे आयोजन केले आहे. मुंबईतील चैत्यभूमी येथे भेट देणारे पर्यटक तसेच अनुयायींसाठी टूर सर्किट निःशुल्क आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘पर्यटन सर्किट’ ही केवळ एक पर्यटन संकल्पना नसून, भारताच्या लोकशाहीचा पाया रचणाऱ्या महामानवाच्या विचारांना अभिवादन करण्याची संधी आहे. या परिपथामुळे अनुयायी व पर्यटकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबधित मुंबईतील स्थळांना भेट देण्याची आणि त्यांच्या विचारसंपदेचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळेल. हा केवळ प्रवास नसून, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मूल्यांची अनुभूती आहे.
या आंबेडकर टूर सर्कीट अंतर्गत दररोज ३ बसेस उपलब्ध करण्यात असून प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार आहे. सहलीमध्ये सहभागी होणारे पर्यटक, अनुयायी यांच्यासाठी निःशुल्क प्रवास, सहल मार्गदर्शक, अल्पोपहार आहे. या सोयी-सुविधा राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयाद्वारे पुरविण्यात येणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचा शुभारंभ ३ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समोर गणपती मंदिर, शिवाजी पार्क येथे होणार आहे
या टूर सर्कीटच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली स्थळे आणि प्रेरणादायी जीवनाचा प्रवास, सामाजिक समता, शिक्षण आणि संविधान निर्मितीतील योगदानाचे महत्त्व सर्व सामान्य नागरिक व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे. सदर टूर सर्कीटची सुरुवात चैत्यभूमी, दादर, मुंबई येथून सकाळी ९.३० वाजता होऊन समारोप चैत्यभूमी दादर येथे होणार आहे. सहलीसाठी संपर्क : सूरज चतुर्वेदी – ८१०८१७५५३०/ पवन पवार – ७६६६६०३२११ / पर्यटन संचालनालय चॅटबोट क्र – ९९९३३०८८८३ संपर्क साधता येईल.
कोणती स्थळे पाहता येतील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटमध्ये चैत्यभूमी, बाबासाहेबांचे दादर पूर्वला असलेले राजगृह हे निवासस्थान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, वडाळा, दादरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, परळमधील ज्या बीआयटी चाळीत बाबासाहेबांचे अनेक वर्ष वास्तव्य होते ते घर, बाबासाहेबांनी स्थापन केलेले फोर्टमधील ‘सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा समावेश आहे.
