फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाने व्यवस्थेविरुद्ध सांस्कृतिक विद्रोही चळवळ करणाऱ्या कबीर कला मंचच्या चार कलाकारांना नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपखाली झालेल्या अटकेमुळे आंबेडकरी चळवळीत मोठी वैचारिक खळबळ माजली आहे. विद्रोह हा आंबेडकरी चळवळीचा स्थायी भाव असला, तरी ती कधी उग्रवादाकडे वळलेली नाही. अशा वेळी आंबेडकरांचे नाव घेऊन चाललेल्या एखाद्या चळवळीतील कार्यकत्यांना नक्षलवादी ठरवून अटक होणे, ही लोकशाहीवर नितांत निष्ठा असणाऱ्या आंबेडकरी चळवळीसाठी धक्कादायक घटना मानली जात आहे. परिवर्तनावादी विचारांचा तरुण वर्ग विद्रोहाच्या नावाने नक्षलवादाकडे सरकत आहे का, अशी गंभीर चर्चा सध्या आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते व विचारवंत यांच्यात सुरू आहे.
कबीर कला मंचचे कलावंत सध्या पोलिसांच्या नजरकैदेत आहेत. दोन वर्षांपूर्वी विद्रोही लेखक-कवी सुधीर ढवळे यांना अटक करण्यात आली. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच शीतल साठे व सचिन माळी यांना अटक करण्यात आली. याच महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासमोर रुपाली जाधव, ज्योती जगताप, रमेश गायचोर आणि सागर गोरखे हे तरुण हजार झाले. त्या आधी नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ांमधील जवळपास ३० ते ३५ तरुणांना पकडण्यात आले होते आणि त्यांतील बहुतांश तरुण बौद्ध आहेत, अशी माहिती मिळते आहे.
ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले, की मराठा समाजातील घराणेशाहीच्या विरोधातून मराठा, माळी, कुणबी व बौद्ध समाजातील गरीब मुले उग्रवादी-मार्क्‍सवादी विचारांकडे वळत आहेत. त्यांच्यातील उठाव दाबण्यासाठी आंबेडकरी चळवळीचा संबंध नक्षलवादाशी ‘जोडा आणि फोडा’ असे त्यांचे धोरण आह़े. त्यातून हा प्रश्न निर्माण झाला आहे. कबीर कला मंचशी संबंधितसुमेध जाधव यांनी मात्र, विद्रोही चळवळीतील कार्यकर्त्यांचा नक्षलवादाशी संबंध नसल्याचे सांगितले. मात्र चळवळीत मरगळ आल्याने काही आक्रमक तरुण वेगळ्या वाटेने जात असावेत, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. पँॅंथर नेते राजा ढाले यांनी चळवळीपुढे नक्षलवादाचे आव्हान नाही, असे सांगत मार्क्‍सवाद संपूनही भारतातील कम्युनिस्ट तो जीवंत ठेवण्याचा प्रयत्न का करीत आहेत, असा सवाल केला.     

इतिहासाची पुनरावृत्ती : १९६७ मध्ये जन्माला आलेला नक्षलवाद १९७२ मध्ये उदयास आलेल्या पॅंथरमध्ये कसा घुसला, हे एक कोडेच होते. अखेर आंबेडकरवाद की मार्क्‍सवाद असा झगडा होऊन पॅंथरचे विघटन झाले. ४० वर्षांपूर्वीची स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे.