रेल्वेमार्गावर होणारे अपघात आणि अपघातग्रस्तांना मिळणारी तातडीची मदत, याबाबत अनेकदा चर्वितचर्वण होऊनही ऐन आणीबाणीच्या वेळी स्थानकाबाहेर उभी असलेली १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध होऊ न शकल्याची घटना मंगळवारी दुपारी सँडर्स्टरोड स्थानकात घडली. घडली. विशेष म्हणजे या रुग्णवाहिकेसाठी १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता पुण्यातील कॉल सेंटरमध्ये बसलेल्या कर्मचाऱ्यांकडून उलट सँडहर्स्टरोड स्थानक कुठे आहे, महाराष्ट्रातच आहे का, असे प्रश्न विचारण्यात आल्याने या सेवेच्या एकंदरीत उपयुक्ततेबद्दल प्रश्नचिन्ह व्यक्त होत आहे. अखेर अपघातग्रस्ताला रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी अक्षरश: १५ मिनिटांत टॅक्सीने जे जे रुग्णालयात पोहोचवले.
मंगळवारी दुपारी १.५०च्या सुमारास सँडहर्स्टरोड स्थानकात तीन आणि चार क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मच्या मध्ये रेल्वेमार्गावर एक तरुण पडला. या तरुणाच्या डोक्याला आणि डाव्या खांद्याला जखम झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच स्टेशन उपअधीक्षक विनायक शेवाळे यांनी १०८ या टोल फ्री क्रमांकावर फोन केला. हा फोन पुणे येथील कॉल सेंटरमध्ये जातो. तेथून नेहमीच जुजबी प्रश्न विचारले जातात. मात्र शेवाळे यांना, ‘सँडर्हस्टरोड स्थानक कुठे आहे,’ असे विचारण्यात आले. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून दुसरे स्थानक सँडहस्र्टरोड असल्याचे सांगूनही समोरील व्यक्तीने, ‘म्हणजे महाराष्ट्रातच आहे का,’ असाही प्रश्न विचारला.
या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे गोंधळलेल्या शेवाळे यांनी स्थानकातील आपल्या कर्मचाऱ्याला रुग्णवाहिकेजवळ पाठवले. स्थानकाजवळच उभ्या असलेल्या या रुग्णवाहिकेतील डॉक्टर जेवणासाठी गेले होते. तर चालकाने, ‘पुण्याहून फोन आल्याशिवाय आपण सेवा देऊ शकत नाही’, असे सांगून अंग काढून घेतले. जखमी झालेल्या तरुणाची गंभीर स्थिती बघून शेवाळे यांनी तातडीने जवळून जाणाऱ्या एका टॅक्सीला थांबवले. दोन रेल्वे कर्मचाऱ्यांना सोबतीला देत या तरुणाला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघात झाल्यानंतर इतर प्रवासी स्टेशन अधिक्षकांकडे मदतीच्या आशेने बघतात. मात्र आमच्या दिमतीला रुग्णवाहिका नसल्याने आम्हीही हवालदील असतो. अनेकदा संतप्त प्रवाशांनी आमच्या अंगावर धाव घेण्याचे प्रसंगही घडले आहेत. मात्र आज घडलेला प्रसंग आमच्यासाठीही धक्कादायक आहे. सँडहर्स्टरोड स्थानक महाराष्ट्रातच आहे का, हा प्रश्न रुग्णवाहिकेची सेवा स्थानकाबाहेरच देणाऱ्यांनी विचारावा, ही बाब गंभीर आह़े
-विनायक शेवाळे,
सँडर्स्टरोडचे स्टेशन उपअधीक्षक़