मुंबई : परदेशात स्थानिक झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी आपल्या मुलांना उत्तम मराठी यावे व त्यांची संस्कृतीशी नाळ टिकून राहावी यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिकाद्वारे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या माध्यमातून मराठी भाषा विषयाची मूल्यमापन परीक्षा घेतली. यंदा या परीक्षेचे दुसरे वर्ष असून, अमेरिका, कॅनडा डेन्मार्क आणि नॉर्वेमध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये गतवर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या महाराष्ट्रातील कुटुंबियांच्या मुलांना आपली मायबोलीचे ज्ञान असावे, त्यांना भाषा कळावी यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका व महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागामार्फत गतवर्षीपासून अमेरिका, कॅनडा आणि डेन्मार्कमधील मराठी मुलांना मराठी भाषा शिकविण्यात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या मराठी भाषा विषयाच्या संकलित मूल्यांकनासाठी परीक्षा घेण्यात येत आहे. यंदा १७ मे रोजी झालेल्या या परीक्षेचा निकाल १८ ऑगस्ट रोजी दुपारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेत अमेरिका, डेन्मार्क आणि कॅनडा या देशांमधून एकूण २२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २०४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामध्ये अमेरिकेतील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग असून, तेथील १६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. कॅनडातील १०, डेन्मार्कमधील १६ आणि नॉर्वेतील १४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये इयत्ता पहिलीच्या ४२, दुसरीच्या ३६, तिसरीच्या ३७, चौथीच्या ३१, पाचवीच्या २३, सहावीच्या १४, सातवीच्या १८ आणि आठवीच्या तीन विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीत मराठीचे शैक्षणिक आणि भाषाविषयक कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे.
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दुप्पटीने वाढ
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर बृहन्महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका व महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभाग यांच्यामध्ये अनिवासी भारतीय मराठी पालकांच्या मुलांना मराठी भाषा शिकता यावी यासाठी डिसेंबर २०२४ मध्ये सामंजस्य करार झाला. या करारासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मराठी शाळांचे प्रमुख राहुल देशमुख यांनी पुढाकार घेतला होता. या करानुसार गतवर्षी प्रथमच घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कॅनडा, डेन्मार्क व अमेरिकेतील एकूण ६० शाळांमधील १०३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. यंदा तब्बल २०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गतवर्षी अमेरिकेमधून ६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर यंदा ही संख्या १६४ इतकी झाली आहे.
यंदा प्रथमच नॉर्वेत परीक्षा
गतवर्षी कॅनडा, डेन्मार्क व अमेरिका या तीन देशांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. तसेच ही परीक्षा अन्य देशांमध्ये घेण्यासाठीही बृहन्महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका व महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार यंदा यामध्ये नॉर्वे या देशाचा समावेश झाला आहे.
देशनिहाय विद्यार्थी संख्या
देश—–विद्यार्थी अमेरिका—–१६४ डेन्मार्क—–१६ नॉर्वे—–१४ कॅनडा—–१० एकूण—-२०४
