मुंबई: मुंबई महापालिकेतील शिवसेना (शिंदे) पक्षाच्या गटनेतेपदी वडाळा येथील अनुभवी आणि तरूण नगरसेवक अमेय घोले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अमेय घोले हे तीन वेळा निवडून आले आहेत. अमेय घोले हे पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू असल्याचे मानले जाते.

मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीच्या प्रक्रियेला आता लवकरच सुरुवात होणार असून सोमवारी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या तिन्ही पक्षांचे नगरसेवक महापालिका मुख्यालयात एकत्र आले. भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाने आपल्या दोन स्वतंत्र गटाची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या गटनेते पदी गणेश खणकर यांना नियुक्त करण्यात आले आहे. तर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या गटनेतेपदी अमेय घोले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. माजी खासदार आणि पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांनी याबाबतची घोषणा केली.

अमेय घोले हे वडाळा येथील नगरसेवक असून सुमारे ११ हजाराच्या मताधिक्याने ते निवडून आले आहेत. एकेकाळी एकसंघ शिवसेनेत आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती असलेले घोले यांनी पक्षफुटीनंतर शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला होता. घोले यांनी वडाळा विधानसभा मतदारसंघातील आपल्या प्रभागात अनेक कामे केली असून त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. तीन वेळा निवडून आलेले घोले हे आरोग्य समितीचे अध्यक्ष देखील होते. घोले यांच्या रुपाने तरुण आणि अनुभवी गटनेता शिवसेना (शिंदे) पक्षाने दिला आहे.

शिवसेना(शिंदे) आणि भाजपा या दोन पक्षांच्या गटनेता निवडीनंतर या दोन्ही पक्षांचे नगरसेवक कोकण भवन येथे कोकण विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणीसाठी निघाले आहेत. त्यामुळे आता महापौर निवडीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.

मुंबई महापालिका निवडणूकीसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडले व १६ जानेवारीला मतमोजणीही झाली. या निवडणूकीत भाजपला सर्वाधिक ८९ जागा मिळाल्या. तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाला २९ जागा मिळाल्या. शिवसेना (ठाकरे)पक्षाला ६५ जागा तर मनसेला सहा जागा मिळाल्या. निवडणूकीचा निकाल लागून पंधरा दिवस उलटून गेले असून या काळात शिवसेना (ठाकरे), मनसे, कॉंग्रेस, एमआयएम या पक्षांनी कोकण भवन आयुक्तांकडे जाऊनआपली गटनोंदणीही केली. मात्र स्पष्ट बहुमत मिळालेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे) या पक्षांनी अद्याप आपली गटनोंदणी केलेली नव्हती. स्वतंत्र गटनोंदणी करायची की संयुक्त याबाबतचा निर्णय होत नसल्यामुळे ही गटनोंदणी रखडली होती. त्यातच गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शासकीय दुखवटा जाहीर झाल्यामुळे ही गटनोंदणी होऊ शकली नाही.