मुंबई: शिवसेना (शिंदे) पक्षाचे गटनेते अमेय घोले यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट केवळ सदिच्छा भेट होती असे घोले यांनी स्पष्ट केले आहे. मात्र या भेटीचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. घोले यांनी यांनी राज ठाकरे यांची भेट का घेतली? या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? या भेटीचे कारण काय? खरेच ही सदिच्छा भेट होती का? अशा अनेक वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात विशेषतः पालिका वर्तुळात सुरू आहेत. त्यांच्या भेटीचे छायाचित्रही समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर फिरत आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक यावेळी ठाकरे बंधूंनी एकत्र लढवली. ठाकरे बंधूंची युती विरुद्ध भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्ष अशी ही प्रमुख लढत झाली होती. अत्यंत गाजावाजा करीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू महापालिका निवडणूकीच्या तोंडावर एकत्र आले. ‘एकत्र आलो …एकत्र राहण्यासाठ’ अशीही भविष्यवाणी उद्धव ठाकरे यांनी केली. कार्यकर्त्यांचेही मनोमिलन झाल्याचे दाखले दिले जाऊ लागले.
या निवडणूकीच्या प्रचारात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने उद्धव ठाकरे यांच्यावर वेळोवेळी टीका केली. पण राज ठाकरे यांच्यावर टीका करणे नेहमी टाळले. त्यातच निवडणूकीनंतर काही दिवसांनी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तेव्हाही त्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होती. सोमवारी पालिकेतील शिवसेना (शिंदे) पक्षाचे गटनेते अमेय घोले यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र ही भेट केवळ सदिच्छा भेट होती अशी प्रतिक्रिया घोले यांनी दिली आहे. तसेच अधिक बोलण्यास नकार दिला.
लोकसभेची तयारी …
लोकसभेच्या निवडणुकीला अद्याप खूप कालावधी असला तरी मनसेशी आतापासून जुळवून घेण्याचे प्रयत्न शिवसेना(शिंदे) पक्षाने सुरू केले असल्याचे बोलले जात आहे. मनसेचे मुंबई महापालिकेत केवळ सहा नगरसेवक असले तरी मुंबईत सर्व प्रभागात मनसेची काही हजारात मते आहेत. या मतांची बेगमी आतापासूनच केली जात असल्याची चर्चा आहे.
मराठीचा मुद्दा …
राज्यातील सर्व अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना एक मे पासून मराठी भाषा सक्ती करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे या निर्णयाला परभाषिक रिक्षा, टॅक्सी चालकांनी विरोध केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. तर या निर्णयाला मनसेचे विविध ठिकाणी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ही भेट होती का असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
