मुंबई : समीर वानखेडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बरेच दिवस रिक्त असलेल्या अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई विभागीय संचालकपदी नवी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी अमित घावटे एनसीबीचे नवे मुंबई विभागीय संचालक असतील. आर्यन खान प्रकरणानंतर मुंबई एनसीबीवर झालेल्या आरोपांनंतर त्यांची प्रतिमा सुधारण्याचे मोठे आव्हान घावटेंवर आहे. घावटे हे पूर्वी बंगळूरु आणि चेन्नई येथील विभागीय संचालक म्हणून कारभार पाहात होते. त्याशिवाय अमनजितसिंह यांची चंडीगड एनसीबी विभागीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे, तर ग्यानेंद्रकुमार सिंह यांची दिल्लीच्या विभागीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणातील तपासाशी संबंधित दोन अधिकाऱ्यांना नुकतेच निलंबित करण्यात आले. त्यापूर्वीही आणखी एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण तो आर्यन खान प्रकरणाशी संबंधित नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.