मुंबई : एका अनौपचारिक चर्चेत मुंबईत पाऊस आणि महापालिकेच्या गलथान कारभारामुळे झालेल्या दोन दुर्घटनांवर, असंवेदनशीलपणे व्यक्त होतानाचे द्रुकश्राव्य चित्रण (व्हिडीओ) समोर आल्याने मुंबईचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांना विरोधकांनी शनिवारी चोहोबाजूंनी घेरले. महापालिकेच्या कारभारावरून सर्वत्र नाराजीची भावना आहे. त्यात महापौरांपासून भाजपचे सर्व नेते महापालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार आणि गैरकारभारासाठी शिवसेनेला (उद्धव ठाकरे गट) जबाबदार ठरवत आहेत. अशावेळी भाजप नेत्यांचे असे चित्रण समोर आल्याने, त्यांनाच परिस्थितीचे गांभीर्य नसल्याची सार्वत्रिक टीका होत आहे.

यावर खुलासा करताना, माझ्या बोलण्यातील संदर्भ बदलून विपर्यास करण्यात आल्याचे साटम यांनी म्हटले. स्थायी (स्टॅण्डिंग) समितीतील ‘अंडरस्टॅण्डिंग’ आम्ही बंद केल्याने विरोधक आपल्याला लक्ष्य करीत असल्याचा आरोप त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

मुंबईत पावसाला सुरूवात होताच ३० जूनला चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून एका ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या दिवशी विधानसभेत साटम यांनी मुंबईतील गेल्या काही वर्षातील महापालिकेच्या गैरकारभारावरून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि महायुतीतील आपल्या सहकारी पक्षाकडे असलेल्या नगरविकास खात्याच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. त्यांच्या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी २ जुलैला साकिनाका येथे अस्लम शेख यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. यावरून पुन्हा एकदा पालिकेवर टीकेचा भडिमार होत असताना, विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जयंत पाटील यांनी साटम यांना आदल्या रात्रीच्या भाषणाचा संदर्भ देत छेडले. त्यावर व्यक्त होताना साटम यांचे वक्तव्य कॅमेऱ्यात कैद झाले. ‘काल झाडावर होतं, आज मॅनहोल झाले’ असे हसतहसत बोलत असतानाचे त्यांचे चित्रण प्रसिद्ध झाले आणि विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.

माझ्या बोलण्याचा विपर्यास

कुणाचा मृत्यू झाला म्हणून मी हसलो नाही. तर पाटील यांच्याशी अनौपचारिकपणे बोलत असताना त्याचा संदर्भ घेऊन माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. जे घरात बसून प्रतिक्रिया देतात त्यांना उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही. अशा प्रकारच्या दुर्घटना झाल्यानंतर कधीही कुणाचे निलंबन झाले नव्हते. मात्र आपण आवाज उठवल्यानंतर पालिकेचे सात अधिकारी निलंबित झाले आहेत. आम्ही घटनास्थळी राहून आढावा घेत आहोत. आजपर्यंत उद्धव, राज किंवा आदित्य ठाकरे यांना पावसात रस्त्यावर उतरलेले पाहिले आहे का? ज्यांनी आपापसात युती केली त्यांचे प्रतिनिधी ‘स्टॅण्डिंग’मधील ‘अंडरस्टॅण्डिंग’ सुरू करा अशी विनंती करत आहेत, जी आम्ही धुडकावून लावली होती.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार दूर करून तिला सूतासारखे सरळ करायचे आहे. इथला मलिदा बंद झाल्याने त्यांचा राग अनावर झाला आहे. म्हणून ते मला लक्ष्य करत आहेत. परंतु, त्याला आम्ही जुमानणार नाही. मुंबईकरांना भ्रष्टाचारविरोधी प्रशासन देण्याकरिता आम्ही कटीबद्ध आहोत, असे स्पष्टीकरण मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केले आहे.

फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा ‘भाऊ’ इतकीच तुमची प्रतिमा

राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या निवेदनात दिला.

अमित साटम यांच्याप्रमाणे बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडेवागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील, असे आवाहन त्यांनी केले.
तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाही. कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत. हे असले प्रकार होतात, तेव्हा कोणताही खेद तुमच्याकडून व्यक्त केला जात नाही. तेव्हा तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी व्यक्त केली. तुमच्या मौनाचे नेमके कारण काय, असा प्रश्न ठाकरे यांनी केला.

विधानसभेच्या पायऱ्यावर भाजपचे अमित साटम मुंबईतील दुर्घटनांची टिंगल करत होते. किती निर्जज्जपणा एखाद्याच्या रक्तात असावा? कुठलीही घटना झाली की टिंगल उजवायची, हास्यविनोद करायचा ही भाजपची घाणेरडी, भयानक वृत्ती आहे. मुंबईकरांना कुणाच्या हातात सत्ता दिली आहे, हे कळायला लागले आहे.

  • आदित्य ठाकरे, आमदार, शिवसेना (ठाकरे गट)

मुंबईत पावसाने दोन मृत्यू झाले. यात एक ११ वर्षांचा शाळकरी मुलगा होता. तर दुसरे ज्येष्ठ नागरिक आहे. या घटनांवर मुंबईचे भाजपचे अध्यक्ष निर्लज्जपणे दात वेंगाडून हसत आहेत. ही क्रूरता आणि विकृती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडीतरी संवेदनशीलता असेल तर अशा व्यक्तीला पदावरून ताबडतोब हाकलून दिले पाहिजे.

  • खासदार संजय राऊत