मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदी केंद्र सरकारच्या जैम पोर्टलवरून थेट उत्पादकांकडूनच करावी अशी मागणी आमदार अमीत साटम यांनी केली आहे. तसेच महापालिकेने शालेय वस्तू वाटण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे अशीही मागणी साटम यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून गणवेशापासून पेन्सिल, रबर, वह्या, पुस्तके, बूट मोजे, छत्री अशा २७ विविध वस्तू मोफत दिल्या जात आहेत. या वस्तूंच्या खरेदी प्रणालीत आमूलाग्र बदल करण्याची मागणी आमदार अमीत साटम यांनी केली आहे. साटम यांनी महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना या प्रकरणी पत्र लिहिले आहे. सध्या या वस्तू कंत्राटदारांमार्फत खरेदी केल्या जातात. अनेकदा हे कंत्राटदार उत्पादकांकडून वस्तू घेऊन महापालिकेला वाढीव किंमतीत विकतात असल्याचे निदर्शनास आल्याचे आमदार अमीत साटम यांनी म्हटले आहे. शालेय वस्तूंची खरेदी आणि महिलांच्या सबलीकरणासाठी वितरित केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वितरणासाठी केंद्र सरकारच्या जेम (Government e-Marketplace) पोर्टलचा तातडीने अवलंब करण्याची मागणी आमदार अमीत साटम यांनी केली आहे. त्यामुळे महापालिकेतील दीर्घकाळ चालत आलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसेल असेही मत साटम यांनी व्यक्त केले आहे.

तसेच महापालिकेने शालेय वस्तू वाटण्याऐवजी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीचाही विचार करावा अशी मागणी केली आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करावी, असे आमदार अमीत साटम यांनी म्हटले आहे.आमदार अमीत साटम यांनी पुढे मागणी केली की, यापुढे शालेय वस्तूंसह जेंडर बजेट अंतर्गत महिलांना वितरित होणाऱ्या सर्व सामग्रीची खरेदीही जेम पोर्टलवरूनच केली जावी. त्यामुळे महानगरपालिकेचा निधी मोठ्या प्रमाणावर वाचेल, खरेदीमध्ये पारदर्शकता येईल आणि भ्रष्टाचार रोखण्यास मदत होईल. अशा पद्धतीने खरेदी केल्यास वाढीव किंमतीमध्ये महापालिकेस वस्तू देता येणार नाहीत, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.