मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या आठवड्यात मुंबईच्या दोन दिवस दौऱ्यावर असून रविवारी, १३ सप्टेंबर रोजी ते प्राच्यविद्या क्षेत्रात दाेन दशके संशोधन कार्य करत असलेल्या फोर्टमधील दि एशियाटिक सोसायटीला भेट देणार आहेत.  नुकतीच झालेली या संस्थेची निवडणूक वादग्रस्त ठरली होती.  भाजप आणि उजव्या गटाच्य कार्यकत्यार्त्यांच्या एशियाटिक टुमारो या गटाने ही निवडणूक जिंकली होती.

अमित शहा यांना या भेटीदरम्यान संस्थेकडील दुर्मिळ पोथ्यांचे प्रदर्शन दाखवले जाणार आहे. भारतीय न्याय संहिता आणण्यामध्ये अमित शहा यांचे योगदान आहे. भारतीय न्याय संहितेचा उगम हा धर्मशास्त्रामध्ये असल्याचे विद्यमान पदाधिकाऱ्यांचे मत आहे. भारतरत्न पा.वा. काणे यांनी लिहिलेला भारतीय धर्मशास्त्राचा पाच खंडातील इतिहास संस्थेने जतन करून ठेवलेला आहे.

संस्थेच्या निवडणुका जुलै महिन्यात पार पडल्या आणि भाजपचे माजी राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे अध्यक्ष झाले. गृहमंत्री शहा यांनी संस्थेला भेट द्यावी असे पत्र डॉ. सहस्रबुद्धे यांनी अध्यक्ष या नात्याने शहा यांना दिले होते. त्यानुसार या आठवड्यातील मुंबई भेटीदरम्यान संस्थेला भेट देण्याचे शहा यांनी मान्य केले आहे.

यासंदर्भात नुकतीच संस्थेच्या विश्वस्त आणि विविध समित्यांच्या सदस्यांची बैठक झाली आणि गृहमंत्री शहा यांच्या भेटीच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी सोमवारी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांची एक बैठक घेतली आणि रविवारी गृहमंत्री संस्थेला भेट देणार असल्याचे सांगितले.

कोलकात्याच्या एशियाटिक सोसायटीला महत्त्वाची राष्ट्रीय संस्था म्हणून विशेष दर्जा देण्यात आलेला आहे. तो दर्जा मुंबईच्या एशियाटिक संस्थेला मिळावा, अशी संस्थेच्या तत्कालीन व्यवस्थापनाने चार वर्षांपूर्वी केंद्राकडे मागणी केलेली आहे. अमित शहांच्या या भेटीमुळे ही मागणी मान्य होण्यास पाठबळ मिळणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना वाटते.

मागच्या आठवड्यात राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांनी एशियटिकला भेट दिली. गृहमंत्र्यांच्या भेटी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत असतील. त्यामुळे संस्थेच्या प्रलंबित मागण्या तडीस जातील, अशी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आशा आहे.  केंद्रीय गृहमंत्र्यांने एशियाटिकला भेट देण्याची ही पहिली वेळ आहे. एशियाटिकच्या विद्यमान पदाधिकाऱ्याच्या विरोधातील कुमार केतकर यांच्या नेतृत्वाखालील गटाने एशियाटिक संस्थेला भगवीकरणापासून वाचवा, अशी निवडणुकीत हाक दिली होती.

भेट  ठरली आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एशियाटिक संस्थेला रविवारी भेटीची निश्चिती झाली आहे. संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, विविध समित्यांचे सदस्य आणि कर्मचारी हे भेटीवेळी उपस्थित असतील. – अभिजीत मुळये, एशियाटिकच्या छाननी समितीचे सदस्य