महायुतीतील नेत्यांची शहांकडे मागणी

महायुतीतील घटकपक्षांना सन्मान आणि सत्तेत योग्य सहभाग द्यावा, अशी मागणी घटकपक्षांतील नेत्यांनी केली असून भाजपला आमच्यामुळे निवडणुकांमध्ये लाभ होईल, असे या नेत्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणुकीत घटकपक्षांनी स्वबळावर लढून ताकद दाखविली आहे, असेही त्यांनी शहा यांच्या निदर्शनास आणून दिले.

शहा यांनी मुंबईभेटीत सह्य़ाद्री अतिथिगृहावर घटकपक्षांतील नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे व जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांच्याशी शहा यांनी सुमारे पाऊण तास चर्चा केली.

पश्चिम महाराष्ट्रात भाजपबरोबर जनसुराज्य, रासप यांची साथ असेल, तर निवडणुकांमध्ये चांगले यश मिळेल, अशी भूमिका कोरे व जानकर यांनी मांडली. लिंगायत समाजालाही त्यांनी बरोबर घेतलेले आहे, असे सांगून पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत या नेत्यांनी मते मांडली. मेटे यांनी भाजपकडून योग्य सन्मान मिळत नसल्याची तक्रार केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने अनेक ठिकाणी युती केली नाही, याबद्दल या नेत्यांची तक्रार होती. पण तरीही स्वबळावर घटकपक्षांनी यश मिळविले असल्याचेही शहा यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

महायुतीतील नेत्यांना सन्मान व सत्तेतील योग्य सहभाग मिळाल्यास निवडणुकीत पुढील वाटचाल सुरळीत होईल, असे घटकपक्षांच्या नेत्यांनी शहा यांना सांगितले. सर्वाना बरोबर घेऊन जाण्याचीच भाजपची भूमिका असल्याचे आश्वासन शहा यांनी या नेत्यांना दिले.

चर्चेला नकार देत राजू शेट्टी दिल्लीत

स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांचे सध्या भाजपबरोबर बिनसले असून शिवसेनेशी सूर जुळले आहेत. शेतकरी संघटनांच्या बैठकीसाठी शेट्टी हे नवी दिल्लीला गेले असून शहा यांच्याबरोबर चर्चेला त्यांनी नकार दिला होता.