भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा विश्वास; मित्रपक्ष कोण याबाबत मात्र मौन

राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच या कालावधीदरम्यान शिवसेना सोबत असेल किंवा नाही, याबाबत मात्र भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सूचक मौन बाळगले. तसेच प्रत्येक राज्यात दौऱ्यावर गेल्यावर मित्र पक्षाच्या नेत्यांची भेट घेतो, त्याच धर्तीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट करीत या भेटीला फार महत्त्व दिले नाही.

अमित शहा यांच्या तीन दिवसांच्या मुंबई भेटीला शुक्रवारपासून सुरुवात झाली. ‘लोकसत्ता’ ला दिलेल्या खास मुलाखतीत शहा यांनी भाजपचे सरकार टिकेल, हे सांगताना ते कोणाच्या मदतीने टिकेल याबाबत मात्र सूचक मौन बाळगले. केंद्र व राज्यात शिवसेना आमच्याबरोबर सत्तेत आहे. मित्र पक्षांचा आम्ही सन्मानच करतो असे सांगताना शहा यांनी अलीकडेच नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित होते, याकडे लक्ष वेधले. पक्ष संघटना अधिक बळकट करण्याकरिता देशव्यापी दौऱ्याचे अभियान सुरू असून त्याचाच भाग म्हणून मुंबईत आलो असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. प्रत्येक राज्यात गेल्यावर मित्र पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतो. त्याचाच भाग म्हणून ‘मातोश्री’वर जाणार आहे. याचा अर्थ नाईलाज म्हणून जाणार असे नाही, असे शहा यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिताच कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. यामुळे राज्यागणिक वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असेही शहा यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांची तुलना करता येणार नसल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले.

फडणवीसांचे काम चांगले

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे काम चांगले आहे. फडणवीस हेच पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी, अशी ग्वाहीही शहा यांनी दिली. मुख्यमंत्री, मंत्री आणि एकूणच संघभावना म्हणून सरकारचे काम उत्तमरित्या सुरू आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशावरून भाजप सरकारच्या कामावर राज्यातील जनता समाधानी आहे हेच स्पष्ट होते, असेही शहा यांनी सांगितले.

प्रत्येक राज्यात गेल्यावर मित्र पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतो. त्याचाच भाग म्हणून ‘मातोश्री’वर जाणार आहे. याचा अर्थ नाईलाज म्हणून जाणार असे नाही.  अमित शहा, भाजपचे अध्यक्ष