राज्याची यंत्रणा सज्ज!

तौक्ते चक्रीवादळासंदर्भात अमित शहा यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा 

तौक्ते चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता जम्बो कोविड केंद्रातील रुग्णांचे रविवारी इतर रुग्णालयांमध्ये स्थलांतर करण्यात आले. (छाया- प्रदीप दास)

तौक्ते चक्रीवादळासंदर्भात अमित शहा यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा 

मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे  सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्य़ांमध्ये सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टी भागात ९०० टन क्षमतेचे प्राणवायू निर्मिती प्रकल्प असून त्यांच्या सुरक्षिततेचे आव्हान लक्षात घेऊन त्यासाठी तयारी करून ठेवली आहे. विशेषत: करोना परिस्थितीत रुग्णालयांचा विद्युतपुरवठा खंडित होऊ नये व तेथील प्राणवायुपुरवठा यंत्रणाही सुरळीत राहील यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बैठकीत दिली.

तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांची बैठक अमित शहा यांनी रविवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली. महाराष्ट्र, गुजरातचे मुख्यमंत्री तसेच दादर नगर हवेलीचे प्रशासक यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला.

चक्रीवादळात नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनाने केलेल्या तयारीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही तसेच पर्यायी (बॅकअप) यंत्रणा लगेच कार्यान्वित होईल व रुग्णांच्या उपचारांत अडथळा येणार नाही यासाठी सावध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जम्बो व इतर कोविड केंद्रे ही पावसापासून संरक्षण करणारी असली तरी मोठे वादळ झाल्यास समस्या उद्भवू शकते, हे लक्षात घेऊन सावधगिरी म्हणून मुंबई तसेच इतरत्रही या केंद्रांतील रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे.

सध्याच्या काळात प्राणवायूची गरज लक्षात घेता सागरी किनाऱ्यांवरील प्राणवायू उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांमधील उत्पादन व वाहतूक सुरळीत सुरू राहील यासाठी नियोजन केले आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस यांना विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. किनाऱ्यांवरील कच्च्या घरांतील लोकांना दुसरीकडे हलविण्यात आल्याचेही ते म्हणाले. मंत्रालय नियंत्रण कक्ष सज्ज असून इतरही जिल्ह्य़ांतील नियंत्रण कक्षांशी त्यांचा समन्वय आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सागरी किनारपट्टी भागातील प्राणवायू उत्पादन करणारे प्रकल्प सुरक्षित राहतील याबाबत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्हाधिकारी तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना सूचना देण्यात आल्या आहेत. महावितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम तसेच प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अपवादात्मक परिस्थितीत  कुठल्याही  प्रकल्पास काही समस्या उद्भवली तर पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amit shah discusses with chief minister regarding cyclone tauktae zws

ताज्या बातम्या