मुंबई: भाजपतील अंतर्गत कलह विकोपास गेला असून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हा पक्ष एकसंघ दिसत असला अंतर्गत वादाचा ज्वालामुखी कधीही फुटू शकतो म्हणूनच गृहमंत्री अमित शहा पक्ष आणि खासदार फोडाफोडीच्या राजकारणातून सन २०२९ च्या निवडणुकीसाठी स्वत:ची तयारी करीत असल्याचा गौप्यस्फोट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केला. भविष्यात पक्षातून विरोध झाल्यास घटकपक्षांचा मजबूत पाठिंबा मिळविण्यासाठीच शहा यांचे फोडाफोडीचे राकारण सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यात लवकरच मतदार यादी पूर्णपणे शुद्ध अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण( एसआयआर) मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत मनसेने सक्रीय होण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. राज्यातील महावितरण मोडीत काढून संपूर्ण विजवितरण अदानी कंपनीच्या घशात घालण्याचा तसेच जैन धर्मियांना हाताशी धरुन नवनवीन वाद निर्माण करुन राजकीय पक्षांना त्या गुंतवूण एसआयआर मोहिमेच्या माध्यमातून आपले ध्येय साध्य करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
केंद्रात आणि राज्यातही भाजपची सत्ता असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्यामागे अमित शहा यांचे राजकारण असून ते सन २०२९च्या लोकसभा निवडणुकीची आणि पंतप्रधान होण्याची तयारी करीत असल्याचा दावा ठाकरे यांनी केला. भाजपमधील सध्याचा अंतर्गत कलह पाहता पुढील लोकसभा निवडणुकीत होणारा संभाव्य विरोध लक्षात घेऊन अमित शहा भाजपसोबतचे घटकपक्ष मजबूत करुन आपली ताकद वाढवत आहेत.
सध्याचे राजकीय वातावरण पाहता कधी काहीही घडू शकते अशावेळी आपण जमीनीवर घट्ट पाय रोवून उभे राह्यला हवे. त्यासाठी एसआयआर मोहिमेत सक्रीय होऊन मतदार याद्यांवर लक्ष ठेवा, आपले मतदार यादीतून दूर होणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे आदेशही ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले.
वीज कंपनीही अदानीच्या दावणीला
राज्यभरात विज पुरवठा करणाऱ्या महावितरण या सरकारी कंपनीचा लवकरच आयपीओ येत आहे. त्यापूर्वीच केंद्राच्या अहवालात या कंपनीला फक्त १.५ टक्के गुण देण्यात आले आहेत. अशा खराब कंपनीत कोण गुंतवणूक करेल असा सवाल करताना ठाकरे यांनी यामागे अदानी कंपनीला फायदा करुन देण्यासाठी महावितरणला बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप केला. महावितरणचा आयोपीओ फसावा आणि त्यातून ही कंपनी बंद पाडून वीज वितरण अदानी कंपनीला देण्याचा घाट घातला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
जैन समाजाला इशारामुंबईतील पांढऱ्या पट्टीवरुन सुरू असलेल्या जैन आणि मराठी वादाबाबत भाष्य करताना त्यांनी जैन मुनींवर बोचरी टीका केली. महाराजांच्या जिरे टोपावर जैनांचा झेंडा, पांढरे पट्टे सहन केले जाणार नाही. काही जैन मुनी चांगले काम करतात. कोणत्याही धर्माविषयी आदर आहे. पण भाजपच्या नादाला लागून नको नको ते वाद निर्माण करणार असाल आणि आम्ही हातात बांगड्या नाही भरल्या अशी भाषा करणार असाल तर मराठी माणसाचे मनगट कधी पाहिले का असा इशाराही ठाकरे यांनी दिला. आम्हाला कुठचेही वाद नको आहेत, भांडण नको आहे. परंतु, वाद उकरून काढणार असाल, तर आम्ही रस्त्यावरती उभे राहू, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.
