मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात भाजपची पक्ष संघटना वाढविण्यावर व ती मजबूत करण्यावर अधिक भर देण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रदेश सुकाणू समितीच्या नेत्यांना सोमवारी दिल्या. महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा कशा मिळतील व मुंबई महापालिकेत सत्ता मिळविण्याकडे शहा हे विशेष लक्ष देणार आहेत.

मुंबई दौऱ्यावर असलेल्या शहा यांनी प्रदेश सुकाणू समितीची बैठक विमानतळावरील दालनात घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, राज्य मंत्रिमंडळातील चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण हे ज्येष्ठ मंत्री, प्रदेश सरचिटणीस आमदार श्रीकांत भारतीय आदी  उपस्थित होते. शहा यांनी राज्यातील मतदान केंद्र निहाय संघटनेच्या कार्यकर्ता फळीची रचना, केंद्रनिहाय किती कार्यकर्ते नियुक्त केले आहेत, जेथे भाजपची ताकद कमी आहे, तेथे ती वाढविण्यासाठी काय करता येईल, आदी बाबींवर सुमारे तासभर सुकाणू समितीतील नेत्यांशी चर्चा केली.

आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा कशा मिळतील, यादृष्टीने नियोजन करण्याच्या आणि पक्षातील नेत्यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवावेत, अशा सूचना दिल्या.

फडणवीस यांचे कौतुक

अमित शहा यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले. फडणवीस सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असून विकासाच्या मार्गाने महाराष्ट्र वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी महाराष्ट्राचे हरवलेले वैभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला, असे गौरवोद्गार शहा यांनी काढले. ए. एम. नाईक शाळेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते.