धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर (मुंबई कोस्टल रोड) वाहनचालकांसाठी एक आगळावेगळा आणि अभिमानाचा अनुभव देणारी अभिनव संगीत संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. या रस्त्यावर विशेष तंत्रज्ञानयुक्त संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. या संगीत मार्गावरील (मेलडी रोड) पट्ट्यांवरून वाहन गेल्यावर स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील ‘जय हो’ हे गाणे ऐकू येणार आहे. हा जगातील पाचवा आणि भारतातील पहिलाच प्रयोग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पोस्ट लिहून या प्रकरणी टीका केली आहे. मुंबईकरांना खरंच याची गरज आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
म्युझिकल रोडची संकल्पना अभियांत्रिकी आणि संस्कृती यांचा संगम
म्युझिकल रोडची संकल्पना केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून, आधुनिक अभियांत्रिकी आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती यांचा अनोखा संगम आहे. महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी रस्ता हा मुंबईच्या आधुनिक पायाभूत सुविधांचे प्रतीक मानला जातो. आता ‘जय हो’ची धून अनुभवता येणारा हा रस्ता मुंबईच्या सांस्कृतिक आणि देशभक्तीपर ओळखीमध्ये आणखी भर घालणारा ठरणार आहे. अमित ठाकरेंनी एक पोस्ट लिहिली आहे सरकारला रोडबाबत पाच प्रश्न उपस्थित केले आहेत.
काय म्हटलंय अमित ठाकरेंनी?
मुंबई महानगरपालिकेचा कोस्टल रोडवरचा म्युझिकल रोडचा प्रयोग नक्कीच नवीन आहे. काहीतरी वेगळं आहे. तंत्रज्ञानाचा असा वापर केल्याबद्दल प्रशासनाचं अभिनंदन! पण मुंबईकरांना खरंच याची गरज आहे का? ही मुंबईकरांची ‘बेसिक’ मागणी तरी होती का? रस्त्यांचे इतके महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित ठेवून हा कसला अट्टाहास?
मराठी मातीतलं गाणं का नाही?
खरंतर कोस्टल रोड म्हणजे रोजच्या ट्राफिकच्या गोंगाटून जरा शांतता! काही दिवस हे कुतूहल म्हणून ठीक वाटेल, पण रोजच्या प्रवाशांसाठी हा केवळ ‘गोंगाट’ ठरणार नाही का? तसेच, गाडी चालवताना ड्रायव्हरचं लक्ष विचलित होण्याची शक्यता प्रशासनाने तपासली आहे का? आणि बरं, काही वाजवायचंच होतं तर, मग आपल्या मराठी मातीतलं गाणं का नाही? आपल्या महाराष्ट्राची ओळख सांगणारं एखादं मराठमोळं गाणं नाही? गर्जा महाराष्ट्र माझा सारखं आपल्या राज्यगीत किंवा स्वरसम्राज्ञी लतादीदींच्या अजरामर स्वरातील एखादं गाणं निवडलं असतं, तर अतिउत्तम झालं असतं!
मनसेलाच ही आठवण का करुन द्यावी लागते?
हा रस्ता मुंबईत आहे, महाराष्ट्रात आहे. मुंबईच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात आपल्या मराठी मातीचा आणि संस्कृतीचा सूर उमटला असता, तर तो अनुभव प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा ठरला असता. पण पुन्हा एकदा आपण आपली ओळख विसरलो. महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच का सांगाव्या लागतात? मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना स्वतःहून मराठी अस्मितेचा विचार का सुचत नाही? आपल्या भाषेच्या आणि संस्कृतीच्या सन्मानाची आठवण आम्हाला वारंवार सरकारला का करुन द्यावी लागते? विकास हा व्हायलाच हवा, नवीन प्रयोगही घडायला हवेत; पण आपल्या संस्कृतीची जाण नसेल तर तो विकास अपूर्ण आहे. त्यामुळे प्रयोग जरुर करा, पण ही कुणाची भूमि आहे आणि इथली संस्कृती काय आहे याचं भान नक्की राखा. असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.
आता अमित ठाकरेंच्या या पोस्टवर सरकारकडून काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या अभिनव संकल्पनेचा प्रसार सन २००७ मध्ये जपानमध्ये झाला. जपानमधील अभियंता शिझुओ शिनोडा यांनी बुलडोझरच्या साहाय्याने रस्त्यावर काम करत असताना हा ध्वनी परिणाम शोधून काढला. पुढे याच प्रयोगातून ‘मेलडी रोड’ ही संकल्पना विकसित झाली. आतापर्यंत हंगेरी, जपान, दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिराती येथे असे प्रयोग करण्यात आले आहेत. भारतातील हा पहिलाच प्रयोग आहे.
