Amit Thackeray on Hotel Politics : मुंबईत महापौरपदासाठी महाशर्यत सुरू आहे. महापौरपदासाठी जुळवाजुळव सुरू असून नगरसेवक पळवा-पळवीचेही प्रयत्न होण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटि्क्स सुरू झालं आहे. शिंदेसेनेने त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना ताज लँड्स एन्डमध्ये ठेवलं आहे. १७ तारखेपासून गेल्या तीन दिवसांपासून हे नगरसेवक तिथेच आहेत. परिणामी या हॉटेलमधील इतर पर्यटकांना सुरक्षेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागत आहे. यावरूनच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित ठाकरे यांनी याबाबत पोस्ट केली आहे.
“नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत?” असा प्रश्न विचारत अमित ठाकरे म्हणाले की, “निकाल लागल्यावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते, लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती. पण दुर्दैवाने, ज्यांना जनतेने निवडून दिलंय, ते आज फाईव्ह स्टार हॉटेलच्या बंद दाराआड ‘आनंदाने’ कैद आहेत.”
सुरक्षेच्या नावाखाली पर्यटकांना त्रास सहन करावा लागतोय
“याला नक्की कारण काय? स्वतःच्याच सहकाऱ्यांवरचा अविश्वास? स्वार्थी राजकारण? या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केले त्यांचा अपमान नाही का होत? किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचे राजकारण? या सगळ्या नाटकामध्ये ज्या पर्यटकांनी स्वतःचे कष्टाचे पैसे भरून हॉटेल बुकिंग केलं आहे, त्यांनाही सुरक्षेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागतोय”, असं अमति ठाकरे म्हणाले.
“लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आता तरी थांबवा! ‘जमल्यास’… ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवलाय तिच्यासाठी काहीतरी करा”, असं आवाहनही त्यांनी केलं.
एकनाथ शिंदे यांच्या नगरसेवकांचं शिबिर
मुंबईत भाजप ८९ तर शिवसेना शिंदे गटाला २९ एकूण ११८ जागा मिळाल्याने महायुतीचा महापौर निवडून येण्यात काही अडचण नाही. तरीही पालिका निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचे संख्याबळ वाढविण्यावर भर दिला आहे. शिवसेना ठाकरे व मनसेच्या काही नगरसेवकांशी संपर्क साधण्यात आला आहे. काही जणांनी पाठिंबा देण्याची अनुकूलता दर्शविली आहे, असे शिंदे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात येते . दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ताज लॅण्डमध्ये नगरसेवकांना ठेवलं असलं तरीही त्यांचे तिथे शिबिर सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
