बॉलिवूडमधील चित्रपटांच्या मुहूर्ताप्रमाणेच आता मराठी चित्रपटांच्या मुहूर्तालाही ‘ग्लॅमर’ मिळायला सुरुवात झाली आहे. बॉलिवूडच्या अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान या दोन ‘सुपरस्टार’ कलाकारांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत दोन मराठी चित्रपटांचा मुहूर्त नुकताच पार पडला.

काळानुरुप मराठी चित्रपटांच्या मुहूर्ताच्या कार्यक्रमातही गेल्या दोन-चार वर्षांत बदल व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र नुकत्याच झालेल्या दोन मराठी चित्रपटांच्या मुहूर्ताला बॉलिवूडचे ‘ग्लॅमर’ मिळाले. यापुढे मराठी चित्रपटाच्या मुहूर्ताचा असाच पायंडा पडण्याची शक्यता आहे. बॉलिवूडच्या या दोन दिग्गजांच्या उपस्थितीमुळे मराठी चित्रपट आणि या व्यवसायाकडे बॉलिवूडचे ‘स्टार’ कलाकारही वेगळ्या दृष्टीने पाहात असल्याचे चित्र दिसायला लागले आहे.

हिंदीतील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य आता मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून ‘स्वामी तिन्ही जगाचा-भिकारी’ असे ते दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटाचे नाव आहे. आचार्य यांनी नृत्य दिग्दर्शनासह यापूर्वी काही हिंदी चित्रपटांचेही दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचा मुहूर्त ‘बिग बी’ अर्थात अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झाला. चित्रपटात स्वप्नील जोशी, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आदी कलाकार आहेत.

प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस आगामी ‘हृदयांतर’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच शाहरुख खान याच्या हस्ते पार पडला.  या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे व अभिनेता सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

शाहरुखने मुहूर्ताची ‘क्लॅप’ दिली तर अभिनेता अर्जून कपूरने मुहूर्ताचा नारळ वाढविला. ‘भिकारी’ व ‘हृदयांतर’ या दोन्ही चित्रपटांचे मुहूर्त पंचतारांकित हॉटेल्समध्ये मोठय़ा थाटामामाटात आणि झगमगटात पार पडले. या वेळी बॉलिवूडमधील अन्य मान्यवरही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अमिताभ बच्चन यांनी या अगोदर मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मराठी चित्रपट निर्मितीत पाऊल टाकले आहे.  अक्षयकुमारनेही या अगोदर मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.