बच्चन कुटुंबीय आणि राज ठाकरे यांच्यातील वादंग ‘गंगेला मिळाले’ असले, तरीही यामुळे संतप्त झालेल्या अबू आझमी यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर टीका केली आहे. आझमी यांच्या टीकेनंतर बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्यांवर सपा आणि बसपा यांच्या कार्यकर्त्यांचा हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी या तीनही बंगल्यांबाहेरचा बंदोबस्त वाढवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या ‘अँग्री यंग मॅन’सह संबंध सुधारलेल्या अमिताभ बच्चन यांना आता ‘गंगा किनारेवाल्या’ छोऱ्यांपासूनच सावध राहण्याची वेळ आली आहे.
पाच वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन उत्तर प्रदेशचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर बच्चन कुटुंबीय आणि राज ठाकरे यांच्यातील वाग्युद्ध रंगले होते. मात्र गेल्या आठवडय़ात षण्मुखानंद सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सेनेच्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन आणि राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र आले. बच्चन यांनी ठाकरे यांच्या सर्व चांगल्या कामांना शुभाशीर्वाद दिले. तर राज यांनीही अमिताभ बच्चन यांची भरभरून स्तुती केली. मात्र, हे पाहून समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांचे पित्त खवळले. त्यांनी त्वरीत बच्चन यांना गद्दार का म्हणू नये, असा प्रश्न विचारत बच्चन यांच्यावर हल्ला चढवला. बच्चन यांनी राज यांच्यासह कार्यक्रमाला हजेरी लावून उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. राज यांनी बच्चन यांच्याप्रमाणे सर्व उत्तर भारतीयांचा स्वीकार केला आहे का, असा प्रश्नही आझमी यांनी विचारला आहे.
आझमी यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुंबई पोलीस सावध झाले आहेत. समाजवादी पार्टी किंवा बहुजन समाजवादी पार्टी यांचे कार्यकर्ते काही गडबड करण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी बच्चन यांच्या जुहू येथील जनक, जलसा आणि प्रतीक्षा या तीनही बंगल्यांबाहेरचा बंदोबस्त वाढवला आहे. बहुजन समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते बच्चन यांच्या बंगल्यासमोर निदर्शने करणार असल्याचे या पक्षाने स्पष्ट केले आहे. त्यामुळेच पोलिसांनी हा बंदोबस्त वाढवला आहे.