मुंबई : अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, विलेपार्लेतील लोकमान्य टिळक गार्डन आणि अंधेरीतील डी.एन. नगर येथील सिमेंट गोडाऊन या तीन ठिकाणांचा विकास आणि व्यवस्थापन विलेपार्ले केळवणी मंडळाकडून करण्यात येणार आहे. या जागांचे एकूण क्षेत्रफळ १४.११ एकर असून त्याची मालकी पूर्णपणे सरकारचीच राहील. ते कधीही ताबा परत घेऊ शकतात, अशी स्पष्टोक्ती आमदार अमरीश पटेल यांनी केली. तसेच त्या भूखंडांचा क्रीडाव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कामासाठी वापर होणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

भाजपचे आमदार अमरीश पटेल यांच्या विलेपार्ले केळवणी मंडळाला म्हाडा व महापालिकेच्या मालकीचे तीन भूखंड देण्यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी आमदार आदित्य ठाकरे यांनीही आक्षेप घेतला असून सार्वजनिक मालमत्ता, विशेषतः मोकळ्या जागा खासगी संस्थेला देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अमरीश पटेल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच सर्व प्रक्रिया नियमांनुसार रीतसर पद्धतीने झाल्याचे त्यांनी सांगितले. तिन्ही भूखंड मर्यादित कालावधीसाठी संस्थेला देण्यात आले असून त्या जागांचे कायमस्वरूपी हस्तांतरण झालेले नाही, असेही ते म्हणाले. त्या भूखंडांवर क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. स्थानिक व युवा खेळाडूंना अधिक चांगल्या क्रीडा सुविधा आणि व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बास्केटबॉल, पिकलबॉल, स्केटिंग, स्क्वॅश तसेच इनडोअर जिम्नॅशियमसारख्या सुविधांचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी लागणारा भांडवली खर्च, संचालन आणि देखभालीचा खर्च संस्था करणार आहे. अंधेरीतील क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त ४० ते ५० प्रमाणित प्रशिक्षक, क्रीडा अधिकारी, समन्वयक आणि शारीरिक शिक्षण शिक्षक नियुक्त करण्याचे प्रस्तावित आहे.

अंधेरीतील क्रीडा संकुल संस्थेला थेट देण्याच्या आरोपावर ते म्हणाले की, या प्रकल्पासाठी पालिकेने सप्टेंबर २०२५ मध्ये निविदा प्रक्रिया राबवली होती. सात संस्थांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला होता. एकूण महसुलातील ५० टक्के हिस्सा देण्याची सर्वाधिक बोली सादर केल्याने पालिकेने संस्थेची निवड केली. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे क्षेत्रफळ ११.५७ एकर, विलेपार्लेतील लोकमान्य टिळक गार्डनचे ०.९२ एकर आणि डी.एन. नगरमधील जागेचे १.६२ एकर आहे,असेही त्यांनी नमूद केले.

आर्थिक नुकसान होणारच

दरम्यान, संस्थेने आतापर्यंत क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी १०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. तसेच मुंबईतील तरुणांना क्रीडा क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तीन भूखंड घेण्यात आले आहेत. त्यावर सुमारे ५० ते ७० कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे निश्चितच संस्थेला मोठा तोटा सहन करावा लागेल. मात्र, तरीही आर्थिक नुकसान सहन करू, असे ते म्हणाले.

पालिकेला ५० टक्के महसूल

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल संस्थेला वार्षिक १ लाख रुपये भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. करारानुसार महापालिकेला ५० टक्के महसूलातील हिस्सा देणे अनिवार्य आहे. याशिवाय संस्थेकडून वार्षिक ११ लाख रुपये कन्सेशन फी आकारण्यात येणार असून त्यात दरवर्षी ६ टक्क्याने वाढ होईल. तसेच संस्थेने २५ लाखांची परफॉर्मन्स सिक्युरिटी रक्कम जमा केली.