“सार्वजनिकरित्या माफी मागा नाहीतर..” अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांना कायदेशीर नोटीशीतून इशारा

४८ तासात मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलिट करा असेही अमृता फडणवीसांनी म्हटले आहे

Amrita Fadnavis issues legal notice to Nawab Malik

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांनी केलेल्या अनेक खुलाश्यानंतर आता या प्रकरणाला वेगळेचे वळण लागले आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांचा ड्रग्ज क्षेत्रातील लोकांशी संबंध आहेत, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच मलिक यांनी ट्विटवरुन अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या जयदीप राणाचा फोटो पोस्ट केला होता. जयदीप राणा ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांनी अमृता फडणवीसांवर अप्रत्यक्षपणे केलेल्या आरोपांनतर त्यांनी नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड असल्याचा धक्कादायक आरोपही नवाब मलिक यांनी केला होता. मात्र पत्रकार परिषदेआधी मलिक यांनी ट्विटवरुन अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केला होता. याच फोटोबद्दल खुलासा करताना फोटोमधील व्यक्ती जयदीप राणा असून अमृता फडणवीस यांनी गायलेल्या मुंबईमधील नद्यांच्या संवर्धनासंदर्भातील गाण्याचा तो फायनान्स हेड होता असा दावा मलिक यांनी केला. तसेच या गाण्याचा कथित ड्रग्ज पेडलर जयदीप राणाशी काय संबंध आहे याबद्दलही नवाब मलिक यांनी माहिती दिली होती.

हे ही वाचा >> “बनवाट नोटा या १४ कोटींच्या नव्हे तर..”; नवाब मलिकांच्या आरोपांना समीर वानखेडेंचे प्रत्त्युत्तर

देवेंद्र फडणवीसांसोबत जयदीप राणाचं खास कनेक्शन असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. फडणवीस महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते तेव्हा मुंबई नदी संरक्षणासाठी एक रिव्हर साँग तयार केलं होतं. सोनू निगम आणि अमृता यांनी ते गाणं गायलं होतं. देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवार यांनीही अभियन केला होता, असे मलिक यांनी म्हटले होते.

“जावई आणि काळा पैसा वाचवण्याचेच मलिकांचे ध्येय”; अमृता फडणवीसांची कवितेच्या माध्यमातून टीका

त्यावरुन आता अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ४८ तासात मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलिट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा असा इशार अमृता फडणवीस यांनी मलिकांना दिला आहे.

अमृता फडणवीस यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. “नवाब मलिक यांनी काही फोटोसह बदनामीकारक, दिशाभूल करणारी आणि अपमानास्पद ट्विटची मालिका शेअर केली आहे. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली फौजदारी कारवाईसह बदनामीची नोटीस येथे आहे. एकतर बिनशर्त सार्वजनिक माफी मागून ४८ तासांत ट्वीट हटवा किंवा कारवाईला सामोरे जा!,” असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

“अमृता देवेंद्र फडणवीस एक भारतीय बँकर आहेत. गायक आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात त्यांना प्रचंड प्रतिष्ठा आहे. आपल्या बदनामीकारक ट्विटमुळे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची सार्वजनिकपणे प्रतिमा डागाळली आहे,” असे या नोटीशीमध्ये म्हटले आहे.

“अंडरवर्ल्ड, बनावट नोटा…” नवाब मलिकांनी फडणवीसांवर फोडला हायड्रोजन बॉम्ब

दरम्यान, नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांनंतर अमृता फडवीसांनी ट्विटरच्या माध्यमातू त्यांच्यावर टीका केली होती. त्याला मलिक यांच्या मुलीने उत्तर दिले होते. “जर आपल्याकडे काही लपवण्यासारखं नसेल तर त्यांना पत्रकार परिषदांची चिंता वाटता कामा नये. जेव्हा सत्य तुमच्या बाजूने असतं तेव्हा तिथे भीती नसते. जर तुमचे काही वाईट हेतू असतील तर ते उघड केले जातील. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हाच एकमेव आमचा अजेंडा आहे,” असे निलोफर यांनी दिले.

पती समीर खान यांच्या घरी ड्रग्ज सापडल्याचं जाहीर वक्तव्य पत्रकार परिषदेत केल्याप्रकरणी निलोफर मलिक यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. फडणवीस यांच्यामुळे माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली असून त्याची भरपाई म्हणून त्यांनी ४ कोटी रुपये द्यावेत व माफी मागावी. अन्यथा कोर्टात जावं लागेल, असा इशारा निलोफर मलिक यांनी फडणवीसांना दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amrita fadnavis issues legal notice to nawab malik abn

ताज्या बातम्या