मुंबई : मेंदू आणि मणक्यात गाठी असलेल्या रुग्णांना कर्करोगावरील उपचारांनंतर पुन्हा स्वावलंबी आणि सक्रिय जीवन जगता यावे, यासाठी इंडियन कॅन्सर सोसायटी (आयसीएस)आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांनी एकत्रितरित्या परळ येथे ‘अमृत स्पर्श’ हे ‘न्यूरो-ऑन्कोलॉजी’ पुनर्वसन केंद्र सुरू केले आहे. कर्करोगाच्या उपचारानंतर सर्वांगीण पुनर्वसनाच्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे.
न्यूरोसर्जरी, अचूक रेडिएशन थेरपी आणि ऑन्कोलॉजीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे मेंदू व मणक्यात गाठी असलेल्या रुग्णांचे उपचार, परिणाम आणि जगण्याचे प्रमाण सुधारत आहे. मात्र, उपचार यशस्वी झाल्यानंतरही अनेक रुग्णांना हालचाल, संतुलन, बोलणे, गिळणे, संवेदनांची प्रक्रिया, स्मरणशक्ती आणि इतर संज्ञानात्मक क्षमतांशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागतो. हीच बाब लक्षात घेत आयसीएसच्या ७५ व्या वर्षानिमित्त ‘अमृत स्पर्श’ केंद्र सुरू करण्यात आले आहे.
‘अमृत स्पर्श’ केंद्राचे उद्घाटन ‘एशियन सोसायटी फॉर न्यूरो ऑन्कोलॉजी’चे अध्यक्ष डॉ. राकेश जालाली आणि ‘इंडियन सोसायटी फॉर न्यूरो ऑन्कोलॉजी’चे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय मुझुमदार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी इंडियन कॅन्सर सोसायटी आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते. या माध्यमातून विशेष न्यूरो-ऑन्कोलॉजी पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची बांधिलकी अधोरेखित होत असल्याचे टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक, अकॅडेमिक्स डॉ. लास्कर यांनी नमूद केले.
मेंदू किंवा मणक्याच्या गाठीवरील यशस्वी उपचाराचा अर्थ केवळ रोगावर नियंत्रण मिळवणे नसून रुग्णाला शक्य तितकी कार्यक्षमता आणि स्वावलंबन पुन्हा मिळवून देणे असल्याचे टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. अलियासगर मोयादी यांनी सांगितले.
अत्याधुनिक सुविधा
या केंद्रात पारंपरिक फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीसोबत अत्याधुनिक व्हर्च्युअल सेन्सरी वातावरण तसेच स्वतंत्र कॉग्निटिव्ह लॅब उपलब्ध करण्यात आली आहे. मेंदू व मणक्याच्या गाठींमुळे निर्माण होणाऱ्या जटिल न्यूरोलॉजिकल आणि कार्यात्मक समस्यांवर येथे विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. अवकाशीय दुर्लक्ष, संतुलनातील अडथळे आणि संवेदनांच्या प्रक्रियेत होणारे बदल यांसारख्या समस्यांवरही उपचार केले जाणार आहेत.
——————————-
गरजुंना मोफत सेवा, प्रशिक्षणातून पुनर्वसन – बहुविषयक उपचारपद्धती
केंद्रामध्ये विविध तज्ज्ञांचा समन्वय साधून रुग्णांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये प्रगत फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच अँड लँग्वेज थेरपी, ऑडिओलॉजी आणि कॉग्निटिव्ह पुनर्वसनाचा समावेश आहे. दैनंदिन जीवनातील आवश्यक कामे पुन्हा स्वतंत्रपणे करता यावीत, यासाठी प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
– मानसिक आरोग्य आणि सामाजिक पुनर्वसनावरही विशेष भर देण्यात आला आहे. समर्पित मानसिक आरोग्य तज्ज्ञ आणि सपोर्ट ग्रुप्सच्या माध्यमातून सहाय्य दिले जाणार आहे. योग तसेच व्यावसायिक पुनर्वसनातून रुग्णांना सक्रिय होण्यास मदत केली जाणार आहे.
– गरजू रुग्णांना पुनर्वसन सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. इतर रुग्णांसाठी या सेवा मोठ्या प्रमाणात अनुदानित दरात उपलब्ध असतील. संबंधित क्षेत्रात विशेष प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञांकडून या सेवा दिल्या जाणार आहेत.
