मुंबईत वीज पुरवठा खंडीत ! अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून प्रकरणाच्या चौकशीचे आदेश

मुंबईकरांसाठी सोमवारचा दिवस उजाडला तोच पॉवर फेल्युअरच्या बातमीने…सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. बेस्टने यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली असून टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटलं. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला. या संदर्भातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात दोन तासांनी यश आलं असून दुपारी बारा वाजल्यापासून टप्प्या टप्प्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पॉवर फेल्युअर प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने यावरुन सरकारला धारेवर धरलं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आपल्या ट्विटर हँडलवर एक सूचक ट्विट केलं आहे. पाहा काय म्हणाल्या आहेत अमृता फडणवीस…

आणखी वाचा- Mumbai Powercut : फडणवीसांनी साधला महाविकास आघाडीवर निशाणा, म्हणाले…

दरम्यान हा बिघाड लवकरच दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुरुवातीला ठाणे, कांजूर, भांडूपमधील अनेक भागांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून दुपारपर्यंत मुंबईतील सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा- राज्य सरकार नियोजनशून्य, व्यवहारशून्य आणि कल्पनाशून्य – शेलार

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा आणि खारघर उपकेंद्रांमधील वीज वाहिन्यांमध्ये आणि ट्रान्फॉरमर्समध्ये अनेक ठिकाणी ट्रीपिंग झालं. मुंबई आणि उपनगरांना होणाऱ्या वीजपुरवठ्यापैकी ३६० मेगावॅट पुरवठ्याला याचा फटका बसला. हा तांत्रिक बिघाड दूर करुन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आलं. मात्र यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. रायगड जिल्ह्यालाही या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला असून तिथेही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amruta fadanvis criticize uddhav thackrey government over power failure in mumbai psd

ताज्या बातम्या