scorecardresearch

नदीवरील गाणं आणि ड्रग्ज प्रकरणावर नवाब मलिकांचे गंभीर आरोप, अमृता फडणवीसांचं २ ओळीत उत्तर

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत नवाब मलिक यांनी नदीवरील गाण्याचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध जोडत केलेल्या आरोपांना दोन ओळीत प्रत्युत्तर दिलंय.

नदीवरील गाणं आणि ड्रग्ज प्रकरणावर नवाब मलिकांचे गंभीर आरोप, अमृता फडणवीसांचं २ ओळीत उत्तर

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज (१ नोव्हेंबर) दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही व्यक्ती जयदीप राणा असल्याचं सांगत त्याच्यावर गंभीर आरोप केले. तसेच फडणवीस आणि राणा यांचा ड्रग्ज व्यवसायाशी संबंध असल्याचा आरोप करत हल्लाबोल केला. यावर आता अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलंय. यात त्यांनी केवळ दोन ओळीचं ट्वीट करत मलिकांना लक्ष्य केलंय.

अमृता फडणवीस म्हणाल्या, “चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते!”

नवाब मलिक काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड असल्याचा धक्कादायक आरोपही नवाब मलिक यांनी केलाय. मात्र पत्रकार परिषदेआधी मलिक यांनी ट्विटवरुन अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केला होता. याच फोटोबद्दल खुलासा करताना फोटोमधील व्यक्ती जयदीप राणा असून अमृता फडणवीस यांनी गायलेल्या मुंबईमधील नद्यांच्या संवर्धनासंदर्भातील गाण्याचा तो फायनान्स हेड होता असा दावा मलिक यांनी केलाय. तसेच या गाण्याचा कथित ड्रग्ज पेडलर जयदीप राणाशी काय संबंध आहे याबद्दलही नवाब मलिक यांनी माहिती दलीय.

जयदीप राणाचा फोटो मी ट्विटरवर पोस्ट केलाय. वर्मा नावाच्या व्यक्तीने सर्व माहिती दिलीय. आम्ही देशाला सांगू इच्छितो की जयदीप राणा तुरुंगामध्ये आहे. एका सुनावणीमध्ये त्याला कोर्टात हजर करण्यात आलं नाही एनसीबी दिल्लीने तो साबरमती जेलमध्ये आहे असं सांगितल्याचं समजतंय, असं मलिक यांनी सध्या राणा कुठे आहे याबद्दल बोलताना सांगितलं.

हेही वाचा : फडणवीस, मुनगंटीवार यांनी अभिनय केलेल्या, अमृता यांनी गायलेल्या ‘रिव्हर साँग’चं ड्रग्ज प्रकरणाशी काय कनेक्शन?

नवाब मलिक म्हणाले, “टी सीरीजने एक गाणं रिलीज केलं होतं. त्यात अमृता फडणवीस यांनी गाणं म्हणत अभिनय केला. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनय केला होता. त्यामुळे ते आम्हाला कधी भेटले माहिती नाही, असं बचाव करता येणार नाही. हा कोण व्यक्ती गाण्याच्या निर्मितीत आर्थिक व्यवहारांचा प्रमुख बनला असंही ते म्हणतील. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणा यांचे संबंध खूप घनिष्ट आहेत. हे दोघे गणपती दर्शनातही सोबत आहेत.”

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या