मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणीची मागणी केल्याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल होऊन तीन वर्षे उलटली. तरी, जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा न्यायवैद्यक विश्लेषण अहवालासारखा महत्त्वाचा पुरावा अद्याप न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नाही. परिणामी, खटल्याची सुनावणी अद्याप सुरू होऊ शकली नाही.

या प्रकरणी सट्टेबाज अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा हे दोघे या प्रकरणी आरोपी आहेत. या दोघांविरुद्ध आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, न्यायवैद्यक अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात न आल्याने, ही प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे परत करण्याची मगणी अनिक्षाने केली होती. तिची ही मागणी न्यायालयाने फेटाळली होती. तथापि, जप्त केलेल्या उपकरणांच्या विश्लेषणाची प्रक्रिया जलदगतीने करण्याबाबत न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पत्र लिहिण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते.

मात्र, प्रकरण प्रलंबित आहे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या विश्लेषणासाठी पुरेशा मनुष्यबळाचा अभाव लक्षात घेता, दोन टॅब, १० सिम कार्ड, नऊ मोबाईल फोन, दोन डोंगल, एक राउटर, एक डीव्हीडी, दोन मेमरी कार्ड आणि दोन पेन ड्राइव्ह यांचे अद्याप विश्लेषण हाती घेतलेले नाही. तसेच, सदर पुरावा प्राधान्याने विश्लेषणासाठी हाती घेतला, तरी विश्लेषण अहवाल तयार करण्यास वेळ लागेल, असे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या वतीने कळण्यात आले होते. त्याचवेळी, हे प्रकरण प्राधान्याने हाती घेण्याचे आश्वासनही प्रयोगशेतर्फे देण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षे उलटूनही अहवाल अद्याप सादर करण्यात आलेला नाही, असेही नुकत्याच झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, व्यवसायाने डिझायनर असलेली अनिक्षा ही २०२१ पासून १६ महिन्यांहून अधिक काळ अमृता यांच्या संपर्कात होती. अनिक्षाने अमृता यांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तिने डिझाइन केलेले कपडे घालण्याची विनंती केली होती. तिची विनंती अमृता यांनी मान्य केली. अमृता यांचा विश्वास संपादन केल्यानंतर अनिक्षाने त्यांना काही सट्टेबाजांबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपल्या वडिलांची सुटका करण्यासाठी अमृता यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न तिने केला. अनिक्षाने काही बनावट चित्रफिती आणि ध्वनिफिती अमृता यांना पाठवल्या आणि त्या आधारे त्यांना धमकावण्यास सुरूवात केली. तसेच, या सगळ्या चित्र व ध्वनिफिती नष्ट करण्यासाठी अमृता यांच्याकडे १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. अन्यथा संबंधित त्या प्रसिद्ध करण्याचे धमकावले. त्यानंतर अमृता यांनी पोलिसांकडे धाव घेऊन या प्रकरणी तक्रार नोंदवली होती.