मिसेस उपमुख्यमंत्री अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईतल्या जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवली आहे. मुंबईत गुरुवारी विसर्जन सोहळा पार पडला. त्यावेळी अनेक सार्वजनिक गणेश उत्सवातील मूर्ती आणि घरगुती गणपतींचं विसर्जन पार पडलं. भाविकांनी साश्रू नयनांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन केलं जातं. निर्माल्य, इतर प्रकारचा कचरा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी जमा होतात. त्या स्वच्छ करण्याचं काम अमृता फडणवीस यांनी केलं. अमृता फडणवीस यांचा लुक चर्चेत अमृता फडणवीस यांनी घातलेला ट्रॅक सूट, हातमोजे आणि गॉगल असा त्यांचा लुक लक्ष वेधून घेत होता. अमृता फडणवीस यांनी जुहू चौपाटी या ठिकाणी असलेल्या इतर स्वयंसेवकांसह स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही आले होते. त्यांचीही भेट अमृता फडणवीस यांनी घेतली. स्वच्छता मोहिमेत अमृता फडणवीस यांनी जो सहभाग घेतला ते फोटो व्हायरल झाले आहेत. महाराष्ट्राचं अराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा. गणपतीचा उत्सव दहा दिवस सुरु होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. अमृता फडणवीस आणि दिविजा फडणवीस यांनी आरती केल्याचे फोटोही चर्चेत होते. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी सागर बंगल्यावरच्या गणपतीची आरती करुन नंतर गणरायाला निरोपही दिला. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्याच दिवशी अमृता फडणवीस या जुहू चौपाटीवरच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. अमृता फडणवीस या मागच्या वर्षीही याच प्रकारे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. अमृता फडणवीस यांची गणेश उत्सवाच्या दरम्यान पुण्यातल्या कोथरुड या ठिकाणीही उपस्थिती होती. अभिनेत्री दिपाली सय्यद आणि अमृता फडणवीस यांनी बरोबर काढलेले फोटो आणि त्यातला त्यांचा लुक या दोन्ही गोष्टी चर्चेत होत्या.