scorecardresearch

“आपली मुंबई आपल्या डोळ्यांसमोर उध्वस्त होतेय”; चिंता व्यक्त करत अमृता फडणवीसांचा संतप्त सवाल, म्हणाल्या…

मुंबईमधील ताडदेव भागातील एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवर अमृता फडणवीस आपलं मत मांडत असतात. आज मुंबईतल्या ताडदेव भागात इमारतीला लागलेल्या भीषण आगीबद्दलही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे आणि त्यासोबतच सध्याच्या सामाजिक परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत संतप्त सवालही उपस्थित केला आहे.

अमृता फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबईतल्या ताडदेव भागातल्या एका २० मजली इमारतीला लागलेल्या आगीचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये अमृता फडणवीस म्हणतात, आपलं शहर मुंबई आपल्या डोळ्यांसमोर उध्वस्त होत आहे, इमारत बांधताना केलेल्या निष्काळजीपणामुळे आपण आपल्या घरातच मरत आहोत. सरकारी रुग्णालयांनी सुरक्षा नियमांचं पालन न केल्याने आपण रुग्णालयातही मरत आहोत, खड्ड्यांची गर्दी असलेल्या रस्त्यांवर होणाऱ्या अपघातातही आपण मरत आहोत. याला जबाबदार कोण?

काय आहे ताडदेव आग प्रकरण?

मुंबईमधील ताडदेव भागातील एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. इमारतीच्या अठराव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरातील नाना चौकातील गांधी रूग्णालयाच्या समोरील कमला बिल्डिंगला ही आग लागली आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार एकूण १५ जण जखमी झाले असून, यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहेत, तर अन्य जणांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amruta fadnavis new tweet taddeo mumbai fire vsk