युकेमधून कुरियरद्वारे पाठवण्यात आलेल्या मिठाई व बिस्कीटाच्या डब्यात गांजा सापडला असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने मोठ्या शिताफीने गुजरातमध्ये सापळा रचून एका आरोपीला अटक केली. मुनाफभाई सय्यद (२५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिठाई आणि बिस्किटाच्या डब्यातून आलेला २५० ग्रॅम उच्चप्रतिचा गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Shraddha Murder Case : न्यायासाठी श्रद्धाचे वडील विकास वालकर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला

यूकेमधून पाठविण्यात आलेल्या कुरियरमध्ये अंमलीपदार्थ असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई विमानतळावरील कार्गो टर्मिनसवरवर तपासणी करण्यात आली. त्यावेळी यूकेहून आलेल्या कुरिअरमधील मिठाई व बिस्कीटाच्या डब्याची तपासणी करण्यात आली. त्यात २५० ग्रॅम गांजा सापडला. कायदेशीर कारवाई करून तो जप्त करण्यात आला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १२ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. गुजरातमधील नवसारी येथे राहणाऱ्या सोहेल शकील खान याच्या नावाने हे कुरियर पाठविण्यात आले होते. त्यामुळे याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन ५ डिंसेबर रोजी नवसारी येथील वितरण केंद्रातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांमार्फत कुरियरवरील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. पत्ता अपूर्ण असल्याने कुरियर घेण्यासाठी संबंधिताला केंद्रावर येण्याची विनंती करण्यात आली. आरोपी कुरियर घेण्यासाठी ७ डिसेंबर रोजी वितरण केंद्रावर आला. त्यावेळी सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली.

हेही वाचा- विश्लेषण: प्रदूषण पातळीत मुंबई दिल्लीच्याही पुढे का? मुंबईची हवा इतकी का खालवली?

मित्राच्या नावाने बनावट कागदपत्र

आरोपीने मित्र सोहेल शकील खानचे नाव कुरियरवर दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. बनावट केवायसीच्या माध्यमातून आरोपीने हा प्रकार केल्याचे सांगितले. त्यासाठी आरोपीने बनावट आधारकार्डाचा वापर केला. या संपूर्ण मालाची खरेदी क्रेडिट कार्ड व अंगडिया व्यावसायिकाच्या मदतीने करण्यात आली होती. युकेमधील इस्माईल हजरत याने ब्रॅडफोर्ड येथून गांजा पाठवल्याचे चौकशीत उघड झाले आहे. आरोपी सय्यद २०२१ पासून यूकेमधून गांजा मागवत होता. त्यात त्याचा एक साथीदारही सहभागी आहे. आरोपी हा गांजा वापीमधील एका व्यक्तीला देणार होता. पण त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली. आता सीमाशुल्क अधिकारी इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An accused from gujarat was arrested in connection with the discovery of ganja in a box of sweets and biscuits sent by a courier from uk at the mumbai airport mumbai print news dpj
First published on: 09-12-2022 at 14:36 IST